विदर्भ तेलुगू समाजम्च्या सभेत विविध विषयांवर चर्चा
By Admin | Updated: May 15, 2014 01:02 IST2014-05-15T01:02:41+5:302014-05-15T01:02:41+5:30
तेलगु बांधवांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

विदर्भ तेलुगू समाजम्च्या सभेत विविध विषयांवर चर्चा
चंद्रपूर : तेलगु बांधवांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चाकरण्यात आली.
अध्यक्षस्थानी किशोर पोतनवार होते. यावेळी तेलगु विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला महासचिव लाजर कांबळे, जिल्हाध्यक्ष आनंद अंगलवार, विदर्भ संघटक राजेश पुल्लरी, उपाध्यक्ष नमिल्ला, तिरुपती पोट्टाला, सागर गंधम, राजन्ना भंडारी, राजेश गडपल्लीवार, मल्लेश कमटम, सतीश दासरवार, पोचम येमुलवार, बाळू कांबळे, अंकम आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
शाळा, विद्यालयाच्या परीक्षा आटोपल्या असून विद्यार्थी पालकांची प्रवेशासाठी धडपड सुरु आहे. विदर्भात तेलगू भाषिकांचे पाल्य शाळांमधून उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांना जात प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. समाजकल्याण विभागाकडून जातवैधता प्रमाणपत्र मिळत नाही. शंभर वर्षाहून अधिक काळापासून महाराष्ट्रात वास्तव्याला असणार्या तेलगू बांधवांच्या पाल्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळत नाही. ज्या नोकरदारांनी जात वैधता प्रमाणपत्र प्रबंधनाकडे सादर केले नाही. त्यांना नोकरीतून काढून टाकण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे हजारो नोकर्या धोक्यात आल्या. याबाबतविदर्भ तेलगू समाज संघर्ष करणार असल्याचा ठराव यावेळी घेण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील एक मुलगी मुंबईला परिचारिकेची नोकरी करते. मात्र, तिला तिचे आई-वडील आंध्रमधून आले, या सबबीखाली जातवैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तिची बढती रोखण्यात आली.
महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने वास्तव्याला असणार्या तेलगू बांधवांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोळसा खाणींच्या हद्दीत नझूल जमिनीवर, शासकीय जमिनीवर स्वत:चे घर बांधून राहणार्या नवृत्त अथवा कार्यरत कामगाराना पट्टे देण्यात येत नाही. त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न अधुरे आहे.
वनविभागाच्या जमिनीवर तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुण शेती करणार्या तेलगू बांधवांना वनहक्काचे पट्टे देण्यात येत नाही. अनुसूचित जाती-जमातीमध्ये मोडणार्या तेलुगू बांधवांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. सभेला मोठय़ा संख्येने समाजबांधव उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)