कुख्यात हाजीच्या अटकेवर चर्चेचे गुऱ्हाळ
By Admin | Updated: May 8, 2015 01:15 IST2015-05-08T01:15:11+5:302015-05-08T01:15:11+5:30
घुग्घूस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर याच्या अटकेवरील चर्चेचे गुऱ्हाळ चांगलेच रंगत आहे.

कुख्यात हाजीच्या अटकेवर चर्चेचे गुऱ्हाळ
चंद्रपूर : घुग्घूस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर याच्या अटकेवरील चर्चेचे गुऱ्हाळ चांगलेच रंगत आहे. पोलिसांनी त्याला अटक केली की त्याने स्वत:हून शरणागती पत्करली, ती नकोड्यात की नागपुरात, अशा विविध प्रश्नांवर सध्या पोलीस वर्तुळातच चर्चा झडत आहेत. काहींच्या मते अन्य गुंडांच्या टोळ्याकडून हाजीच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यातूनच स्वत:ला सुरक्षित करून घेण्यासाठी त्याने पोलिसांपुढे नागपुरात शरणागती पत्करल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने केलेला अटकेचा दावा खरा की पोलीस वर्तुळात सुरू असलेली चर्चा खरी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
विविध गुन्ह्यांचे आरोप शिरावर घेऊन पोलिसांना गुंगारा देत गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात हाजी सरवर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. मध्यंतरी नकोड्यात स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या अटकेसाठी फिल्डींग लावली होती. मात्र पोलीस खात्यातीलच काही मुखबीरांनी त्याला माहिती दिली. त्यातून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. हाजीच्या अटकेनंतर त्याने स्वत: जिल्हा पोलीस अधिक्षकांपुढे दिलेल्या बयाणातून हे सत्य उजेडात आले. त्याची दखल घेत त्याच दिवशी पोलीस अधिक्षकांनी संबंधित पोलीस अधिकारी व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने उचलबांगडी केली.
चंद्रपूर जिल्ह्यासह नागपूर परिसरातही गुन्हेगारीचे साम्राज्य उभे करणारा हाजी पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुन्हेगारी विश्वात अत्यंत सराईत म्हणून ओळख असलेल्या हाजीला परजिल्ह्यातील अन्य गुंडांच्या टोळ्यांशी वैर होते. घुग्घूस परिसरात कोळशाच्या तस्करीत त्याने चांगलाच जम बसविला होता. या व्यावसायिक स्पर्धेतून त्याचे अन्य गुन्हेगारी टोळ्यांशी नेहमीच वाद होत असत. यादरम्यान, हाजीचा अनेक गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलिसही हाजीच्या मागावर होते. पोलिसांचा वाढता दबाव आणि गुंडाच्या अन्य टोळ्यांकडून त्याला भीती होती. (प्रतिनिधी)