शासनाविरोधात असंतोष रस्त्यावर
By Admin | Updated: April 24, 2015 01:02 IST2015-04-24T01:02:22+5:302015-04-24T01:02:22+5:30
राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सतत एक महिना लढा देऊन जी मानधन वाढ मिळविली, ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजपा शासनाने चालविला आहे.

शासनाविरोधात असंतोष रस्त्यावर
चंद्रपूर : राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सतत एक महिना लढा देऊन जी मानधन वाढ मिळविली, ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजपा शासनाने चालविला आहे. त्याच्या निषेधार्थ शहरी प्रकल्पातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन आपला रोष व्यक्त केला.
अंगणवाडी सेविकांना बऱ्याच संघर्षानंतर काँग्रेस शासनाने मानधनात वाढ केली. मात्र नवीन आलेल्या भाजपा सरकार ही मानधनवाढ रद्द करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा निषेध करण्याकरिता अंगणवाडी सेविकांना हा मोर्चा काढला. भाजपा शासनाचा धिक्कार असो, १ एप्रिल २०१४ पासून मानधन वाढ मिळालीच पाहिजे, दिवाळी भेट मिळलीच पाहिजे, भूमीअधिग्रहण कायद्याचा धिक्कार असो, सर्वांना ३५ किलो धान्य मिळालेच पाहिजे, साठ वर्षावरील वृद्धांना पेंशन मिळालीच पाहिजे, फसव्या घोषणा देणे बंद करा आदी घोषणा देण्यात आल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर तिथे सभा घेण्यात आली. यावेळी संध्या खनके म्हणाल्या, १ एप्रिल २०१४ पासून मिळालेली मानधन वाढ ही काही तत्कालीन सरकारची मेहरबानी नाही. रस्त्यावर येऊन लढा देऊन ती आम्ही मिळविली आहे. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली निवडून आलेले भाजपा सरकार म्हणते ही वाढ आम्हाला मान्य नाही. ९५० आणि मदतनीसला ५०० रुपयांची वाढ १ एप्रिल २०१५ पासून देतो, या निर्णयाचा आम्हाला विरोध असून तो निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा. शारदा लेनगुरे यांनीदेखील शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. प्रा. दहीवडे म्हणाले, अच्छे दिनचा फुगा आता पुर्णत: फुटला आहे. अंगणवाडी सेविकाच नव्हे तर कामगार, शेतकरी, शेतमजूर सारेच रस्त्यावर उतरले असून केवळ या देशाच्या बड्या भांडवलदारांना भाजपाला आणि त्यांच्या नेत्याला डोक्यावर घेऊन नाचत आहे. त्यांची निती आणि त्यांचे धोरण असेच राहिले तर या देशाची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असा इशारा दहीवडे यांनी दिला. आशा नाखले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटण्यास गेले व मागण्याचे निवेदन सादर केले. धरणा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पवित्रा ताकसांडे, राधा सुंकरवार, वंदना मुळे, रेखा रामटेके, वैशाली बोकारे, माया कासट्टीवार आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)