वाहतुकीला शिस्त लावणार
By Admin | Updated: November 1, 2014 22:50 IST2014-11-01T22:50:31+5:302014-11-01T22:50:31+5:30
चंद्रपूर शहरात महत्वाचे रस्ते व चौक या ठिकाणच्या वाहनांच्या पार्किंग, सार्वजनिक ठिकाणचे अवैध बांधकाम व अतिक्रमण तसेच ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर आळा घालणे

वाहतुकीला शिस्त लावणार
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात महत्वाचे रस्ते व चौक या ठिकाणच्या वाहनांच्या पार्किंग, सार्वजनिक ठिकाणचे अवैध बांधकाम व अतिक्रमण तसेच ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर आळा घालणे आणि शहरातील नागरी अडचणी, अनुचित व्यवसाय, असामाजिक कृत्ये करण्यावर आळा घालण्यासाठी महानगरपालिकेतर्फे एक ट्रॉली उपलब्ध करण्यात आली आहे. त्या ट्रॉलीचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या ट्रॉलीवर महानगरपालिकेचे १० नागरी पोलीस राहणार असून त्यांना पोलीस विभाग, परिवहन विभाग तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही सहकार्य लाभणार आहे. ही ट्रॉली सोमवार ते शनिवार या दिवशी शहरातील विविध भागात फिरणार असून सोमवारी महत्वाच्या रस्त्यावर सरळ रेषेत वाहने उभे करणे, मंगळवारी मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकणे, व मालकावर बॉम्बे पोलीस अॅक्टनुसार कार्यवाही करणे, बुधवारी ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लॉस्टीक वापरावर कार्यवाही करणे तसेच पानठेले, हातठेले, खानावळ, हॉटेलमध्ये डस्टबिन ठेवली असल्याचे खात्री करणे, गुरुवारी आझाद बाग व रामाळा तलाव बागेत फिरून असामाजिक कृत्ये करणाऱ्यांवर प्रतिबंध घालणे व शुक्रवार व शनिवारी अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्यवाही करणे आदी गोष्टीवर महानगरपालिकेतर्फे आळा घालण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)