पुण्यातील पथकाद्वारे चंद्रपूरचे आपत्ती व्यवस्थापन
By Admin | Updated: August 14, 2016 00:38 IST2016-08-14T00:38:50+5:302016-08-14T00:38:50+5:30
जिल्ह्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाद्वारे जिल्हा शोध...

पुण्यातील पथकाद्वारे चंद्रपूरचे आपत्ती व्यवस्थापन
अधिकाऱ्यांना प्रशिक्षण : आज रामाळा तलावात पूर प्रात्यक्षिक
चंद्रपूर : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाद्वारे जिल्हा शोध व बचाव पथकाकरिता चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याच पद्धतीने जिल्ह्याच्या इतर शहरातही १४ आॅगस्टपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात रामाळा तलाव येथे प्रात्यक्षिक केले जाणार आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन सबआॅर्डिनेट आॅफिसर, दोन महिला स्टॉफ नर्स तसेच २२ जवान असे एकूण २६ जवानांचे पथक त्यांच्या फेमेक्स केलेंडरनुसार जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यामधील आपत्तीप्रवण तालुक्यामध्ये तसेच जिल्हास्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासंबधाने वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकानुसार प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरू आहेत.
चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा स्टेडीयम येथे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, अप्पर जिल्हाधिकारी संजय धीवरे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अजय रामटेके यांचे मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथकाकरिता तसेच नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नीलेश तेलतुंबडे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख मुस्ताक यांची उपस्थिती होती. सदर प्रशिक्षणामध्ये पूर परिस्थितीमध्ये घरगुती साहित्यापासून बचावाचे साधन तयार करणे, बँडेज, रक्तस्त्राव तसेच जखमी व्यक्तीचे वाहतूक पट्टीबंधन, प्रथमोपचार आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाचे पथकप्रमुख व उपनिरीक्षक धुली चंद, उपनिरीक्षक अजित कुमार, कान्सटेबल वीरेन्दर कुमार, सुनील तिवारी, उमेश कुमार, अनीष दुबे, उमराव सिंग, छगन मोरे, अब्दुल मुशीद, दशरवेश कुमार यांच्या उपस्थितीत पथकातील जवानांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. सदर प्रशिक्षणाला जिल्हा कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेचे विवेक कोहळे, जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्य सुनील नागतोडे, विजय मोरे, शरद बनकर, अजय यादव, देवेशकुमार प्रसाद, संतोष चौधरी, राजेश्वर दुर्गे, गोवर्धन जेंगठे, मोरेश्वर भरडकर, विशाल चव्हाण, शोध व बचाव पथकातील सदस्य तसेच जिल्हा क्रीडा संकुलातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व अनेक नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हाभरात प्रशिक्षण कार्यक्रम
२ आॅगस्टपासून जिल्ह्यात प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, चिमूर, मूल, भद्रावती आदी तहसील कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच जिल्हास्तरावर शाळा-महाविद्यालयातही विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. १३ आॅगस्ट रोजी होमगार्ड व पोलिसांना प्रशिक्षक देण्यात आले. तसेच १४ आॅगस्ट रोजी रामाळा तलाव येथे पूर प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे.