सास्ती : वेकोली परिसरात असलेल्या माथरा गावाच्या विकासात वेकोली प्रशासनाने कोणताही हातभार लावला नसून, मागील पाच वर्षांपासून गावाला सीएसआर फंडातून दमडीसुद्धा मिळालेली नाही. वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप खामोना ग्रामपंचायतीचे सरपंच हरिदास झाडे यांनी केला आहे.
माथरा गाव सास्ती खुल्या खाणीलगत असल्याने खाणीतील ब्लास्टिंगमुळे प्रभावित होत आहे व याचा मोठा फटका गावकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे वेकोली प्रशासनाने सीएसआर फंड वाटपात दुजाभाव करू नये व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सोईसुविधा पुरवाव्या, अशी मागणी खामोना ग्रामपंचायतचे सरपंच हरिदास झाडे यांनी केली आहे. खामोना ग्रामपंचायत अंतर्गत माथरा गाव येत असून, वेकोलीच्या कोळसा खाणीला लागून आहे. त्यामुळे खाणीतील होणाऱ्या नियमित ब्लास्टिंगमुळे गाव प्रभावित होत आहे. मुळात गाव वेकोलीच्या प्रभावित क्षेत्रात येत असल्याने सीएसआर फंड मिळणे अपेक्षित आहे; पण मागील पाच वर्षांपासून गावाला दमडीसुद्धा मिळालेली नाही. यामुळे गावकऱ्यांत मोठा रोष पाहायला मिळत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतच्या मासिक सभेत या फंडातून गावाचा विकास करण्यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला आहे.