नवीन रस्त्यामुळे सुविधेऐवजी होणार गैरसोय
By Admin | Updated: February 19, 2015 00:49 IST2015-02-19T00:49:04+5:302015-02-19T00:49:04+5:30
दुर्गापुरात अलिकडे बांधकाम करण्यात आलेला सिमेंट रस्ता उखडला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी त्यावरुनच नवीन रस्त्याचे बांधकाम...

नवीन रस्त्यामुळे सुविधेऐवजी होणार गैरसोय
दुर्गापूर : दुर्गापुरात अलिकडे बांधकाम करण्यात आलेला सिमेंट रस्ता उखडला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी त्यावरुनच नवीन रस्त्याचे बांधकाम करून ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तंत्रशुद्ध कामाअभावी उंची वाढलेल्या रस्त्यावरचे पाणी आता थेट नागरिकांच्या घरात शिरणार असल्याने नागरिक संतापले आहेत. याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे वर्तमान सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी रस्त्याचे इस्टीमेट बनविणारे पंचायत समितीचे अभियंते येथे विकास कामाच्या नावाने नागरिकांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याची ओरड नागरिकांत आहे. दुर्गापूर गावात सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. यापूर्वीही या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचेच बांधकाम झाले होते. त्यामुळे ते काही दिवसातच उखडले. याशिवाय नळाच्या पाईप लाईनसाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आल्याने रस्ते उखडले आहे.
तांत्रिकदृष्ट्या व नियमाप्रमाणे या रस्त्याची डागडुजी करण्याची गरज होती. मात्र येथे आधीच्या रस्त्यावर चक्क नवीन रस्त्याचे बांधकाम करणे सुरू आहे. त्यामुळे आधीच उंच असलेले रस्ते अधीकच उंच झाले आहेत. परिणामी रस्त्यापेक्षा घरे ठेंगणी झाली आहेत.
पावसाळ्यात रस्त्यावरुन वाहणारे पाणी अंगणात व थेट घरात शिरणार, यात शंका नाही. त्यामुळे रस्त्याकाठी राहणारे सर्व नागरिक चिंतेत पडले आहेत. रस्ता कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)