दिंडी पालखीने विरूरनगरी दुमदुमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 01:03 IST2016-01-18T01:03:25+5:302016-01-18T01:03:25+5:30
संत तुकाराम महाराज समिती व धनोजे कुणबी समाज मंडळ विरूर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे ....

दिंडी पालखीने विरूरनगरी दुमदुमली
गावात धार्मिक वातावरण : तुकाराम महाराज महोत्सव सोहळा
विरूर (स्टे) : संत तुकाराम महाराज समिती व धनोजे कुणबी समाज मंडळ विरूर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज महोत्सव सोहळा पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाची मोठी रेलचेल होती.
मंदिर परिसरापासून भजनांच्या स्वरात निघालेल्या पालखीचे प्रस्थान झाले. गावातील प्रमुख मार्गाने पालखी निघाली. परमपुज्य संत तुकाराम महाराजांच्या जयजयकाराने व दिंडी पालखीने गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. येथे संत तुकाराम महाराज महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. पहाटेला गावकऱ्यांनी ग्रामसफाई केली. संत तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्र कार्यावर मान्यवरांनी तसेच तुम्बडे महाराज यांनी रसाळ प्रवचन सादर केले.
रात्री ८ वाजता गोहोकार महाराज व दत्ता मसे यांनी कीर्तन सादर केले तसेच रात्री ११ वाजता संजय शिंदे महाराज यांनी भारुड व गोंधळ सादर केले. सकाळी ८ वाजता संत तुकाराम महाराज यांच गाथा व दिंडी पालखी गावातील प्रमुख मार्गाने फिरविण्यात आली.
भजनात निघालेल्या पालखीने गावात धार्मिक वातावरणाची निर्मिती झाली. संत तुकाराम महाराजांचा जयजयकार करीत भक्तगण मोठ्या उत्साहात पुढे जात होते. या पालखीत परिसरातील विविध गावचे भजन मंडळ सहभागी झाले होते.
पालखी फिरविल्यानंतर मंदिर परिसरात पालखीचे आगमन झाले. दुपारी ३ वाजता दहीहंडीचा कार्यक्रम झाला आणि रात्री ९ वाजता महाप्रसादाचा वितरीत करण्यात आले. याचा लाभ गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने घेतला. रात्री १० वाजता सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीप पाल यांचे कीर्तन सादर करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर मोरे, संतोष ढवस, दत्तू पावडे, सुधाकर मोरे, सुरेश पावडे, रवी बोरकुटे, महेंद्र गोहणे, संदीप मोरे, नामदेव बोरकुटे, मधुकर साळवे तसेच तुकाराम महाराज समिती व धनोजे कुणबी समाज मंडळ विरूर स्टेशन आणि गावकऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)