पोंभूर्णा तालुक्यातील दिघोरी येथे अवैधरीत्या दारूची खुलेआम विक्री केली जात आहे. येथील दारू विक्रीबाबत महिलांनी अनेकदा एल्गार पुकारला होता; परंतु दारु विक्रीला पोलिसांचे छुपे पाठबळ मिळत असल्याने राजरोस दारु विक्री करीत आहेत.
गावात अनेक दारु विक्रेते सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत. गावातील सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरपंच वनिता वाकुडकर, ग्रामसेवक मुन्ना सिडाम, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष कवडू कुंदावार, सामाजिक कार्यकर्ते मुर्लीधर सिडाम, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन विशेष ग्रमसभेत दारू विक्रेत्यांविरोधात कडक निर्बंध लावले आहेत.
गावात दारु विक्री करणाऱ्याचा विद्युत पुरवठा बंद करणे, नळ योजनेचा पाणी पुरवठा बंद करणे, निराधार योजना तसेच ग्रामपंचायतीतर्फे लागू होणाऱ्या योजना बंद करणे, रेशन बंद करणे तद्वतच ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्याबाबतचा ठराव विशेष ग्रामसभेत उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने पारित केला. अवैध दारु विक्रेत्यांविरोधात ग्रामसभेने कडक निर्बंध लावले आहे. गावातील दारु विक्री पूर्णतः हद्दपार करण्याबाबत बेंबाळ पोलीस दुरक्षेत्रचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांना निवेदन दिलेले असल्याने येथील दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. पोलीस काय कारवाई करतात, याकडे गावकऱ्यांंचे लक्ष लागून आहे.