अपूर्ण पांदण रस्त्याने अडचण
By Admin | Updated: February 4, 2016 01:06 IST2016-02-04T01:06:45+5:302016-02-04T01:06:45+5:30
तालुक्यातील देवाडा (खुर्द) येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेला तीन किलोमीटरचा पांदण रस्ता गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण आहे.

अपूर्ण पांदण रस्त्याने अडचण
शेतकऱ्यांची कुचंबणा : निवेदन देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष
पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा (खुर्द) येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेला तीन किलोमीटरचा पांदण रस्ता गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण आहे. सदर रस्ता पूर्ण करण्यासाठी पोंभुर्णा तालुका प्रशासनाला चार वर्षे होऊनही मुहूर्त सापडत नसल्याने शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा (खुर्द) येथील ग्राम पंचायतीअंतर्गत सन २०११ मध्ये रामपूर दिक्षीत येथील शेतशिवारामध्ये तीन किलोमीटरचा पांदण रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर करण्यात आला. या रस्त्यावर शासनाचे लाखो रुपये खर्च करून मातीकाम करण्यात आले. परंतु रस्ता मात्र चार वर्षे होऊनसुद्धा अपूर्णच ठेवण्यात आल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ता निर्माण करून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्वप्न स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे क्षणभंगुर ठरल्याचे चित्र या परिसरात पहायला मिळत आहे.
सततच्या नापिकीमुळे व उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी तूर्तास हतबल होत आहे. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे ध्ये डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो की नाही, याची साधी पाहणीसुद्धा वरिष्ठांकडून केली जात नसल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय होत आहे.
पोंभूर्णा पंचायत समिती व तालुकास्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा स्वतंत्र विभाग असतानासुद्धा या अपूर्ण कामावर पांघरून झाकण्याचे नेमके काय कारण आहे, असा स्थानिक शेतकऱ्यांचा सवाल आहे.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अपूर्ण रस्त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)