डिझेल दरवाढीने मालवाहतूक गॅसवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST2022-04-02T05:00:00+5:302022-04-02T05:00:31+5:30
वर्षभरात डिझेल ३५ रुपयांनी महागला. तो पुन्हा वाढतच आहे. वाहतूकदारांचे व कारखान्यांचे इतर माल वाहतुकीचे वार्षिक कंत्राट केले जाते. त्यासाठी काही अटी व शर्तीही असतात. मात्र, डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने त्याचे पालन करून गाड्या चालवायच्या कशा, असा प्रश्न निर्माण झाला.

डिझेल दरवाढीने मालवाहतूक गॅसवर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डिझेलचे दर झपाट्याने वाढू लागले. २० मार्च २०२२ पासून सुरू असलेली ही वाढ थांबायलाच तयार नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मालवाहतूक अडचणीत सापडली. अनेक ट्रॉन्सपोर्टर काही काळ व्यवसाय बंद ठेवण्याच्या मन:स्थितीत आले आहेत.
दरवाढ कायम राहिल्यास वाहनांचे सुटे व जीवनाश्यक वस्तूंच्या किमती पुन्हा भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशातील पेट्रोलियम विपणन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेल या वाहतूक इंधनांच्या दरांमध्ये सकाळी वाढ केली.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव १२०-१३० डॉलर प्रतिबॅरल पोहोचल्यानंतर ही दरवाढ अपेक्षितच होती. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप ट्रॉन्सपोर्ट संघटनांनी केला.
दहा दिवसांत नऊ वेळा दरवाढ झाली आहे. शु्क्रवारी डिझेलचा दर प्रतिलिटर ९५.८३ रुपये नोंदविण्यात आला. ही वाढ अशीच सुरू राहिल्यास मालवाहतूक महागणार आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाला बसणार आहे.
विमा महागला
अनेक विम्या कंपन्यांनीही प्रिमियममध्ये वाढ केली. डिझेलदर वाढल्याने भाजीपाला, किराणा, दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे दर वाढले. डिझेलच्या वाढत्या दरांबाबत ट्रान्स्पोर्टर्सनी चिंता व्यक्ती केली आहे. विविध कारणांमुळे हा व्यवसाय अडचणीत आला.
वर्षभरात डिझेल ३५ रुपयांनी महागले
वर्षभरात डिझेल ३५ रुपयांनी महागला. तो पुन्हा वाढतच आहे. वाहतूकदारांचे व कारखान्यांचे इतर माल वाहतुकीचे वार्षिक कंत्राट केले जाते. त्यासाठी काही अटी व शर्तीही असतात. मात्र, डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने त्याचे पालन करून गाड्या चालवायच्या कशा, असा प्रश्न निर्माण झाला.
भाववाढीने गणिते बिघडली
कमी वाहने असलेल्या ट्रॉन्सपोर्टचालकांनी आता लांब अंतरावर वाहन पाठविणे बंद केले. डिझेल दरवाढीने आमच्या थोड्याफार फायद्याचेही गणित बिघडवून टाकले.
-एस. एन. राणा, ट्रकचालक
मालवाहतुकीचे दर वाढले. त्यामुळे आता ऑर्डर घटल्या आहेत. लांब अंतरावर मालपुरवठा होत नसल्याने काही दिवस रिकामे राहावे लागत आहे. यातून आमचे नुकसान होत आहे.
-रामन्ना यादव, ट्रकचालक, लालपेठ