धानोरकर दाम्पत्याने आरोग्य यंत्रणेची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:33+5:302021-04-23T04:30:33+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यूदर वाढला आहे. वरोरा- भद्रावती ...

धानोरकर दाम्पत्याने आरोग्य यंत्रणेची केली पाहणी
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यूदर वाढला आहे. वरोरा- भद्रावती येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याकरिता ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणे, मुबलक औषध साठा उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा तसेच प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण भागातील शाळा ताब्यात घ्या अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या.
वरोरा, भद्रावती येथील आरोग्य यंत्रणेचा आढावा खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतला. यात कोरोनापासून प्रभावी लढा देण्याकरिता वैद्यकीय सुविधांचा अभाव पडता कामा नये. ज्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत त्या आमदार निधीतून त्वरित उपलब्ध करण्यात येणार आहे. जनतेनेदेखील कोरोनाची भीती बाळगू नये, असे खासदार बाळू धानोरकर यांनी आवाहन केले.
वरोरा येथील ट्राॅमा कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय व माता महाकाली कोविड सेंटर, आदिवासी वसतिगृह येथील आरटीपीसीआर केंद्र तसेच विलगीकरण केंद्राला भेट दिली. येथील रुग्णांच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर येथील वसतिगृहात वैद्यकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले, नगरसेवक राजू महाजन, वरोरा विधानसभा अध्यक्ष शुभम चिमुरकर, आमदार प्रतिनिधी सुभाष दांदडे यांची उपस्थिती होती. भद्रावती येथे जैन मंदिर येथील कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालय, आरटीपीसीआर केंद्राला भेट दिली. त्यानंतर नगर परिषद भद्रावती येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी अत्यावश्यक आरोग्य सुविधा, ज्यांचा तुटवडा जाणवत आहे त्यांचा आढावा घेण्यात आला. सुविधा आमदार निधीच्या माध्यमातून त्वरित उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शिंतोळे, वैद्यकीय अधिकारी मनिष सिंग, डॉ. नितीन सातभाई, डॉ. असूटकर, पोलीस उपनिरीक्षक जगताप यांची उपस्थिती होती.