ढिवर समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 00:44 IST2016-03-01T00:44:58+5:302016-03-01T00:44:58+5:30
मी स्वत: गरीबीचे चटके सहन केले आहेक. त्यामुळे माझ्या ढिवर-भोई समाजाची सर्वांगिण परिस्थिती कशी आहे,...

ढिवर समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणार
विजय वडेट्टीवार : ब्रह्मपुरीत ढिवर-भोई समाजाचा प्रबोधन कार्यक्रम
ब्रह्मपुरी : मी स्वत: गरीबीचे चटके सहन केले आहेक. त्यामुळे माझ्या ढिवर-भोई समाजाची सर्वांगिण परिस्थिती कशी आहे, याची मला पुर्णत: जाणिव आहे. या समाजातील लोकांना वर आणण्यासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी मी अहोरात्र झटेन, अशी ग्वाही ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे आयोजित ढिवर-भोई समाज प्रबोधन कार्यक्रम व मच्छीमार सहकारी संस्थांच्या मेळाव्याप्रसंगी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजय वडेट्टीवार, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे मार्गदर्शक पुणे येथील सेवानिवृत्त न्यायाधिश चंद्रलाल मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्षा रिता उराडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय सिंगम, चंद्रपूर जिल्हा भोई समाज अध्यक्ष कृष्णाजी नागपुरे, स्व. जतिराम बर्वे स्मृती प्रतिष्ठान नागपूरचे सचिव प्रभाकरराव मांढरे, चंद्रपूर जिल्हा मत्स्य व्वयसाय सहकारी संघाचे प्रशासक तथा चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक बंडू हजारे, एकलव्य ढिवर सेनेचे संस्थापक प्राचार्य के. एल. नान्ने, गडचिरोली जिल्हा मच्छीमार संघाचे माजी अध्यक्ष बाबुराव बावणे, चंद्रपूर-गडचिरोली मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त सुनिल जांभुळे, ब्रह्मपुरीचे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पारधी, जि.प. सदस्य प्रा. राजेश कांबळे, वरोऱ्याचे समाजसेवक तथा जिल्हा बँकेचे संचालक दामोधर रूयारकर, पिंपळकर, खेडकर, शरदराव गिरडे, वडसाचे केवट आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात भगवान नान्ने यांनी सन २०१३ च्या आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत मच्छीमारांच्या नुकसानासाठी दिलेल्या ११.७० कोटीच्या अनुदानासाठी समाज कार्यकर्ते व आ. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या श्रमाचा पाढा वाचून मेळाव्याचा हाच उद्देश असल्याचे सांगितले. नगराध्यक्षा रिता उराडे म्हणाल्या, या समाजाची संघटन शक्ती व एवढा जमाव पाहून मी भारावून गेली आहे. या अज्ञानी, अशिक्षित समाजाने शिक्षणाची कास धरली पाहिजे. या समाजात काहीतरी बदल घडवून आणण्यास शासनाने प्रयत्न करावे. प्रभाकर मांढरे म्हणाले, २०१६-१७ हे वर्ष शासनाने ‘नीलक्रांती वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे ढिवर समाजाने या व्यवसायात क्रांती घडवून आणावी व आपले जीवनमान उंचवावे. वडेट्टीवार म्हणाले, या समाजाची ताकद या दुटप्पी शासनाला दाखवून द्यावी. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ढिवर समाजाच्या सर्व समस्या शासन दरबारी लावून धरणार आहे. राज्यपालाची भेट घेऊन त्या समस्या मार्गी लावण्याचे अभिवचन यावेळी त्यांनी दिले. येत्या २२ एप्रिलला सावलीत सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन केले आहे. ढिवर समाजातील वर-वधूनी यात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
के.एल. नान्ने म्हणाले, महाराष्ट्रात एन.टी. लोकसंख्या ११ टक्के आहे. परंतु आमच्या ढिवर समाजाचा एकही सरपंच, पं.स. व जि.प. सदस्य नाही. मग एवढ्या लोकसंख्येचा फायदा काय? एक कोटी २७ लाख राज्यात भटक्यांची संख्या आहे. सन १९५६ च्या अगोदर ढिवरांच्या टि.सी. वर अनुसुचित जमातीची नोंद होती. राज्यघटना दुरूस्ती कलम ७३/७४ नुसार २४३/घ/६ कलमानुसार ज्या राज्यामध्ये एखाद्या समाजात सामाजिक, शैक्षणिक, राजकिय, आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल तर त्या राज्यातील विधानमंडळाने त्यांना हे आरक्षण द्यावे, अशी तरतुद आहे. सन २०१३ पासून ढिवरांच्या मुलांची शिष्यवृत्ती बंद आहे. ढिवर समाजाच्या मुलांसाठी शासनाने वेगळे वसतीगृह देण्याची मागणी त्यांनी यावेळी आमदार वडेट्टीवारांकडे केली.
अध्यक्षीय भाषणात चंद्रलाल मेश्राम म्हणाले, आपला ढिवर समाज हा कोण्या एका पक्षाचा बांधील नाही. समाजातील कार्यकर्त्यांनी वैयक्तिक हितापेक्षा सामुहिक हिताचे महत्व जपावे.
आज एवढी समाजशक्ती पाहून या समाजाचे या नंतर काहीतरी वेगळे चित्र पाहायला मिळेल. त्यासाठी समाजातील तज्ज्ञांनी व कार्यकर्त्यांनी तयार असावे. समाजाच्या समस्या शासनदरबारी मांडण्याचा मी प्रयत्न करीन.
यावेळी व्यसनमुक्ती, घरकुल, स्थानिक स्वराज्य संस्था, जनजागृती यावर रमेश नान्ने, बंडू हजारे, शरद गिरडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विजय वडेट्टीवार, चंद्रलाल मेश्राम, कृष्णाजी नागपुरे, यशवंत दिघोरे, भगवान नान्ने, यादवराव मेश्राम, पांडुरंग गेडाम यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रेमदास मेंढुलकर यांनी तर आभार दिवाकर डाहारे यांनी मानले.
कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यासह भंडारा, नागपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)