बाप्पाच्या स्थापनेसाठी भक्तांची लगबग

By Admin | Updated: September 17, 2015 00:47 IST2015-09-17T00:47:33+5:302015-09-17T00:47:33+5:30

शुक्रवारी लाडक्या गणरायाची सर्वत्र स्थापना होणार आहे. यासाठी गणेश मंडळांनी लगबग सुरू केली असून गणेशोत्सव शांततेत साजरा केला जावा, ...

Devotees of devotees for the establishment of Bappa | बाप्पाच्या स्थापनेसाठी भक्तांची लगबग

बाप्पाच्या स्थापनेसाठी भक्तांची लगबग

चंद्रपूर : शुक्रवारी लाडक्या गणरायाची सर्वत्र स्थापना होणार आहे. यासाठी गणेश मंडळांनी लगबग सुरू केली असून गणेशोत्सव शांततेत साजरा केला जावा, यासाठी प्रशासनही सज्ज झाला आहे. पोलीस अधिक्षक संदीप दिवान यांनी मंगळवारी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करावे, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये, यासाठी गणेश मंडळानी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.
पोलीस मुख्यालय येथे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीला उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, विज विभागाच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, मनपाचे उपायुक्त विजय इंगोले, तहसिलदार गणेश शिंदे, पोलीस निरिक्षक सिरसकर व शांतता समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
नियम हे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी असतात, त्यामुळे नियमांचे पालन झालेच पाहिजे. वर्गणी ही वर्गणी असावी, जबरदस्ती नसावी, सार्वजनिक गणेश स्थापना करताना विविध परवानग्या घेऊनच स्थापना करावी, असे पोलीस अधिक्षक संदीप दिवान यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात दीड हजारावर सार्वजनिक गणपतीची स्थापना होणार असून १० हजारांपेक्षा अधिक घरगुती गणपतींची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताजने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दारू रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक
गणेशोत्सवाच्या पर्वावर परजिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूची आयात केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दारू तस्कर व विक्रेते यांच्याविरुद्ध तगडी फिल्डींग लावली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यात एक अधिकारी व १० पोलीस शिपाई कार्यरत राहतील. हे पथक डोळ्यात तेल घालून दारू विक्री व तस्करीवर नियंत्रण ठेवतील.
दीडशे पोलीस अधिकारी राहणार तैणात
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासाठी १५० पोलीस अधिकारी, दोन हजार ७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तात राहणार आहे. यासोबतच गृहरक्षक दलाचे ७०० जवान तैनात राहणार आहेत. त्यात ६०० पुरूष व १०० महिलांचा समावेश आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याची खबरदारी बाळगली जाणार आहे.
दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन
राज्यातील काही भागात भीषण दुष्काळ असून गणेश मंडळांनी आपल्या काही खर्चात कपात करता आली तर ती जरूर करावी व हा निधी राज्याच्या दुष्काळी भागाला द्यावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक संदीप दिवान यांनी गणेश मंडळांना केले. दुष्काळी भागाला मदत करणे समाज म्हणून आपल दायित्व आहे. गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवून अनावश्यक खर्च न करता तो पैसा दुष्काळग्रस्तांना द्यावा व आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
रस्त्यावर मंडप उभारणाऱ्यांवर कारवाई
गणेश मंडळाना लागणाऱ्या विविध परवानग्या मनपा, वीज विभाग, परिवहन विभाग व पोलीस विभागाच्या वतीने दिल्या जातात. न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणीही रस्त्यावर मंडप उभारु नये, जितक्या जागेची परवानगी असेल तितक्याच जागेवर मंडप उभारला जावा, वाहतुकीला अडथळा होता कामा नये, पीओपीच्या मूर्ती बसवू नये, परवानगी घेऊनच वीज वापरावी, निर्माल्य हे मनपाने ठेवलेल्या कलशातच टाकावे, मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी परिवहन विभागाकडून करून घ्यावी, अशा महत्त्वाच्या सूचना गणेश मंडळांच्या सदस्यांना देण्यात आले आहेत. या सूचनांचे पालन करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

Web Title: Devotees of devotees for the establishment of Bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.