नियोजनशून्यतेमुळे रखडला पकडीगुडमचा विकास
By Admin | Updated: November 15, 2014 01:30 IST2014-11-15T01:30:56+5:302014-11-15T01:30:56+5:30
शेतकऱ्यांना सिंचनासाठी वरदान ठरलेला पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प नियोजनशुन्यता व प्रशासकीय अनास्थेमुळे कुचकामी ठरला आहे.

नियोजनशून्यतेमुळे रखडला पकडीगुडमचा विकास
वनसडी : शेतकऱ्यांना सिंचनासाठी वरदान ठरलेला पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प नियोजनशुन्यता व प्रशासकीय अनास्थेमुळे कुचकामी ठरला आहे. उद्योगाव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणीच पोहचत नसल्याने प्रकल्पाच्या हेतुलाच हरताळ फासला जात आहे. या प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीकडे संबंधित अधिकाऱ्याच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे येथील विकास रखडला आहे.
सद्या रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून शेतात गहू, ज्वारी, हरभरा तसेच कपाशीचे पीक आहे. दरवर्षी सदर धरणातून कालव्याद्वारे पाणी शेतापर्यंत पोहचविले जाते. यासाठी कालव्यांची स्वच्छता सिंचन विभाग करीत असते. मात्र येथील दोन्ही कालवे अद्यापही स्वच्छ करण्यात आले नाहीत. कालव्यात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असल्याने पाण्याचा पुरवठा होईल की नाही, याबाबत सांशकताच आहे. काही ठिकाणी तर कालवा कोरडा पडल्याचे दिसून येते. कागदोपत्री कालवे स्वच्छ झाले असल्याचे दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. येथील प्रकल्पाचे कार्यालय गडचांदूरला असल्याने तेथून कारभार सुरू आहे. तालुक्यातील अमलनाला सिंचन प्रकल्प व या प्रकल्पाची धुरा एकाच शाखा अभियंत्याावर आहे. अमलनाला धरणासोबतच पकडीगुडमचीही प्रभारी धुरा सांभाळत असल्याने प्रकल्पाकडे पाहिजे तेवढे लक्ष देणे शक्य होत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचन कालव्याच्या पाण्याद्वारे होते. परंतु शेतात पीक वाढत असताना मात्र कालव्याद्वारे पाणी उपलब्ध होत नसल्याने पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. उद्योगासाठी सिंचन विभाग नियमित पाणीपुरवठा करीत असताना शेतकऱ्यांना मात्र सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आसहे. यापूर्वी या प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी कोट्यवधी खर्च करण्यात आला. परंतु हजारो हेक्टरवरील शेतपिके सिंचनापासून वंचित आहे, हे वास्तव आहे. या प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रकल्प निर्मितीनंतरही अनेक वर्षे लोटूनही याठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. कालव्यांनाही खड्डे पडले असल्याने पाणी वाया जात आहे. (वार्ताहर)