बल्लारपूरसाठी सव्वाशे कोटींची विकास योजना
By Admin | Updated: November 6, 2014 22:53 IST2014-11-06T22:53:16+5:302014-11-06T22:53:16+5:30
निवडणुकीत आम्ही जनतेला जी आश्वासन देतो, ती पूर्ण करतो. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हे आमचं ब्रिदवाक्य आहे. आमच्या पक्षाची सत्ता आल्यास बल्लारपूरचा सर्वांगीण विकास करू,

बल्लारपूरसाठी सव्वाशे कोटींची विकास योजना
बल्लारपूर : निवडणुकीत आम्ही जनतेला जी आश्वासन देतो, ती पूर्ण करतो. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हे आमचं ब्रिदवाक्य आहे. आमच्या पक्षाची सत्ता आल्यास बल्लारपूरचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन येथील जनतेला दिले होते. सव्वाशे कोटी रुपये बल्लारपूरच्या विविध विकास कार्याला लावून ते आश्वासन नक्कीच पूर्ण करू, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील जनतेला मंगळवारी दिली. ना. मुनगंटीवार यांचे येथे स्वागत करण्यात आले.
स्थानिक महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या स्वागत समारंभात ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले, मुनगंटीवार यांच्या सहधर्मचारिणी सपना मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हरिष शर्मा, शहर अध्यक्ष शिवचंद द्विवेदी, जिल्हा उपाध्यक्ष अजय दुबे, महिला आघाडीच्या रेणूका दुधे, रामधन सोमानी, जगदीश गहेरवार, प्रमोद कडू, समीर केने, निलेश खरवडे, अशोक गुप्ता, देवनारायण चौहान इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. हार घालून मुनगंटीवार यांचे स्वागत करण्यात आले. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात बल्लारपूर तालुक्यातील समस्यांसोबतच, दारुबंदी, स्वतंत्र विदर्भ, टोलनाका, औद्योगिक प्रश्न, पर्यावरण या विषयावरही भरभरुन बोलले. या साऱ्या समस्या प्राधान्यक्रमाने आम्ही नक्कीच सोडवू, त्याला थोडा अवधी लागेल. तोपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवून धीर धरा, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला. आघाडी सरकारने पैशाची वारेमाप उधळपट्टी करुन राज्याची तिजोरी रिकामी केली. आम्हाला काटकसर करुन ती तिजोरी भरावयाची आहे. येथील मतदारांनी मला आमदार बनविले. मुख्यमंत्र्यांनी मंत्री बनवून माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. राज्याच्या तिजोरीची चाबी सांभाळत सहकारी मंत्री व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने राज्याचा विकास करायचा आहे. कामगारांवर अन्याय होऊ नये, अशी औद्योगिक ध्येय धोरण ठरवून ती राबवायची आहेत. राज्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, ग्रामीण भागाचाही विकास साधायचा आहे, असे शेवटी ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)