पालिकांनी विकास आराखडा तयार करावा

By Admin | Updated: November 4, 2015 00:48 IST2015-11-04T00:48:13+5:302015-11-04T00:48:13+5:30

केंद्र शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी व अंमलबजावणीसाठी नगरपालिकांनी शहर विकास आराखडा तयार करावा अशा सूचना ...

The developers should prepare the development plan | पालिकांनी विकास आराखडा तयार करावा

पालिकांनी विकास आराखडा तयार करावा

अहीर यांचे निर्देश : केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबवा
चंद्रपूर: केंद्र शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी व अंमलबजावणीसाठी नगरपालिकांनी शहर विकास आराखडा तयार करावा अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी येथे मंगळवारी बैठकीत दिल्या. स्थानिक विश्रामगृहात घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व केंद्र सरकारच्या इतर योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सुचना केल्या. महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम. मुरंबीकर व उपआयुक्त मनपा विजय इंगोले यावेळी उपस्थित होते.
ना.हंसराज अहिर यांनी विविध योजनांचा आढावा घेऊन केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना केल्या. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य सेवा वेळेत मिळाव्या असे त्यांनी सांगितले. शहरी भागात वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट महानगरपालिका व नगरपालिकाने प्राधान्याने पूर्ण करावे. चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत ७५ हजार कुटूंब असून १७ हजार कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही. महानगरपालिकेने विशेष मोहिम हाती घेतली असून या अंतर्गत पाच हजार ५०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी दोन हजार कुटूंबांना निधी वितरीत केला असून उर्वरीत कुटूंबांना तात्काळ वितरीत करण्यात असे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्हयातील नगरपालिकांनी वैयक्तिक शौचालय योजना प्राधान्याने राबवून जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याचे निर्देश ना. हंसराज अहीर यांनी या बैठकीत दिले. बल्लारपूर आणि राजूरा नगर पालिकेने मार्चअखेर वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. यावेळी विज विभागाचाही आढावा त्यांनी घेतला. चंद्रपूर व बल्लारपूर शहरात भूमिगत विद्युत व्यवस्था करण्यासाठीचे नियोजित असून या दृष्टीने विज विभाग नियोजन करत असल्याचे अधिक्षक अभियंता यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The developers should prepare the development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.