इरई नदीचा रिव्हर फ्रंट म्हाडाने विकसित करावा
By Admin | Updated: August 7, 2016 00:38 IST2016-08-07T00:38:28+5:302016-08-07T00:38:28+5:30
चंद्रपूर शहराच्या उत्तर- दक्षिण सीमेलगत असलेल्या इरई नदीचा रिव्हर फ्रंट म्हाडाने विकसित करावा...

इरई नदीचा रिव्हर फ्रंट म्हाडाने विकसित करावा
मुनगंटीवारांचे निर्देश : इरई विकास आराखड्यासंदर्भात बैठक
चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या उत्तर- दक्षिण सीमेलगत असलेल्या इरई नदीचा रिव्हर फ्रंट म्हाडाने विकसित करावा आणि नदी खोलीकरण, नदीवर बंधारे बांधण्याचे काम जलसंपदा विभागाने करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
इरई नदी विकास आराखड्यासंदर्भातील बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस आ. नाना शामकुळे, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त संजय काकडे आदी उपस्थित होते.
इरई नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत नदीतील गाळ काढण्याच्या कामाबरोबरच खाणींच्या ओव्हरबर्डनची माती तसेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात निर्माण होणारी राख पाणलोट क्षेत्रातील नदी-नाल्यांद्वारे इरई नदीत येण्यास प्रतिबंध करणे, इरई धरण स्थळाच्या खालील पाणलोट क्षेत्रात ठिकठिकाणी सिमेंट व गॅबियन बंधारे बांधणे, इरई धरणस्थळापासून खालील भागात इरई नदीवर साखळी बंधाऱ्यांचे बांधकाम करणे, शहराला लागून असलेल्या पडोली पुलापासून दाताळा पुलापर्यंत नदीच्या दोन्ही काठांचे सौंदर्यीकरण करणे, नदीकाठावर मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करणे अशी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
ही कामे नोव्हेंबरपर्यंत सुरु करावीत, नदीच्या जमीनीवर अतिक्रमण करू नये. म्हाडाने यासंबंधीचा सर्वंकष विकास आराखडा तयार करावा, त्यासाठी डिसेंबर २०१६ च्या विधिमंडळ अधिवेशनात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. (शहर प्रतिनिधी)