बल्लारपुरातील दरोडेखोर वरोरा पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: February 12, 2015 00:48 IST2015-02-12T00:48:19+5:302015-02-12T00:48:19+5:30
येथील नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून रात्री घरफोड्या करून माल पळविणाऱ्या बल्लारपूर येथील कुख्यात दरोडेखोर दोन युवकास वरोरा पोलिसांनी अटक केली आहे.

बल्लारपुरातील दरोडेखोर वरोरा पोलिसांच्या जाळ्यात
वरोरा : येथील नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून रात्री घरफोड्या करून माल पळविणाऱ्या बल्लारपूर येथील कुख्यात दरोडेखोर दोन युवकास वरोरा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी वरोरा शहरात दोन घरफोड्या केल्याची कबुली देत ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले.
दोघांनाही आज वरोरा न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वरोरा शहरातील बावणे लेआऊटमध्ये राहणारे मधुकर आसेकर हे २७ मे २०१४ रोजी आपल्या कुटुंबियांसह बाहेर गावी गेले असता, रात्री त्यांच्या घरात चोरी करून ५० हजार रुपयाचे सोने, चांदीचे दागिणे व ८० हजार रोख असा एक लाख ३० हजार रुपयाचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. त्यानंतर ३ सप्टेंबर २०१४ रोजी बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील सेंट अॅन्स कॉन्व्हेंट नजीक राहणारे रवींद्र जोगी यांच्या घरी कुणीही नसल्याचे साधून ३१ हजार रुपयाचे सोने व चांदीचे दागिणे लंपात केले. अशा एकापाठोपाठ एक घरफोड्या करून चोरटे फरार होत असल्याने वरोरा पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे होते.
दोन्ही चोरटे बल्लारपूर येथील असून गडचांदूर येथे भाड्याने खोली करून राहत होते. वरोरा शहरात चोरी करायची व गडचांदूरमध्ये राहायचे. त्यामुळे ते हाती लागत नव्हते. ते गडचांदूर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खोलीवर धाड टाकली असता, अजय मधुकर काने (२०) व बजरंग बापूराव काने (३०) हे दोघेही खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, वरोरा शहरातील दोन घरफोड्या केल्याची कबुली डीबी पथकास देत चोरीतील ६० हजार रुपयाचे दागिणे पोलिसांच्या स्वाधीन केले.
प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मल्लीकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल सांगळे, डीबी पथक प्रमुख उमाकांत गौरकार, नितीन जाधव, राकेश तुराणकर, प्रकाश पखान, अनिल बैढा, निलेश ठेंगे, निकेश मुळे यांनी केला. दोन्ही आरोपींकडून आणखी घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. (तालुका प्रतिनिधी)