सपत्निक देहदानाचा निर्धार
By Admin | Updated: September 2, 2016 01:03 IST2016-09-02T01:03:46+5:302016-09-02T01:03:46+5:30
मृत्यू हा अटळ असून तो एक दिवस येणारच आहे. समाजातील गरजूंना देहाचा उपयोग झाला,

सपत्निक देहदानाचा निर्धार
नेत्रदान आधीच : मूल येथील शिक्षकाचा पुढाकार
राजू गेडाम मूल
मृत्यू हा अटळ असून तो एक दिवस येणारच आहे. समाजातील गरजूंना देहाचा उपयोग झाला, तर नवीन जगण्याची इच्छा जागृत होईल. देहदानानंतर इतरांना मिळणारे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मूल येथील शिक्षक प्रशांत मधुकर गटलेवार व त्यांच्या पत्नी रंजना प्रशांत गटलेवार यांनी देहदानाचा निर्धार केला आहे.
यापूर्वी त्यांनी नेत्रदानही केले आहे. मात्र नेत्रदान करताना शासकीय यंत्रणेकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य न मिळाल्याने मानसिक त्रास सहन करावा लागल्याने आता त्यांनी थेट राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मूल येथील कार्यालयात लेखी पत्र देऊन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. देहदानाचा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन उचलेले गटलेवार दाम्पत्यांचे पाऊल प्रेरणा देणारे आहे.
मूल येथील वॉर्ड नं. १७ मधील रहिवासी प्रशांत गटलेवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोमनाथ प्रकल्प, मूल येथे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतरही सामाजिक क्षेत्रात ते सतत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांनी एका मुलीवर कुटुंब नियोजन करून शासनाच्या उद्देशाला समर्थन देण्याचा व वाढणाऱ्या लोकसंख्येवर आळा घालण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला.
नेत्रदान करण्याच्या प्रक्रियेसाठी सतत भटकण्याची पाळी आली ही पाळीसुद्धा देहदानाच्या वेळी येऊ नये, यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मूल येथील कार्यालयात रिसतर पत्र देऊन शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. मृत्यूनंतर इतरांना सुख देता यावे. समाजात त्यांना नवीन विश्व बघता यावे, यासाठी गटलेवार दाम्पत्यांनी देहदानाचे उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. ते इतरांना प्रेरणादायी ठरले व वंचित घटकांना त्याचा फायदा होईल,हेच या देहदानातून अभिप्रेत आहे.
नेत्रदान करताना अनुभव वाईट
मागील वर्षीच्या काळात त्यांंनी नेत्रदान करण्यासाठी प्रयत्न केला.रीतसर प्रक्रिया पूर्ण केली. मात्र नेत्रदान करण्यासाठी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोठमोठ्या जाहिराती दिल्या जातात. प्रत्यक्षात शासकीय यंत्रणा निस्तेज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.