आई-वडिलांचे छत्र हरविल्याने तन्वी-गौरी झाल्या निराधार !
By Admin | Updated: February 6, 2016 01:09 IST2016-02-06T01:09:07+5:302016-02-06T01:09:07+5:30
तीन वर्षापूर्वी वडिलांचे छत्र हरविल्यानंतर आईने वडिलांची उणिव भासू न देता दोन मुलींना तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न केला.

आई-वडिलांचे छत्र हरविल्याने तन्वी-गौरी झाल्या निराधार !
नियतीचा क्रूर खेळ : पतीच्या निधनानंतर मुलींसाठी केला संघर्ष
राजू गेडाम मूल
तीन वर्षापूर्वी वडिलांचे छत्र हरविल्यानंतर आईने वडिलांची उणिव भासू न देता दोन मुलींना तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला आईचे प्रेमसुद्धा हिसकावून घ्यायचे होते की काय? काळाने तिच्यावरही झडप घातल्याने दहा वर्षीय तन्वी व चार वर्षीय गौरी आईविना पोरक्या झाल्या आहेत. ६५ वर्षीय एकमेव आजी असल्याने संगोपनाबरोबरच जगण्याचा प्रश्नही त्या दोघींसमोर उभा ठाकला आहे.
मूल येथील भारती प्रभाकर बोर्डावार यांचा विवाह चंद्रपूर येथील सुशिल केशव आयतवार यांच्याशी झाला. त्यांना तन्वी (१०) व गौरी (४) अशा दोन मुली झाल्यात. सर्व काही सुरळीत संसार सुरू असताना १२ एप्रिल २०१२ ला एका अपघातात सुुुशिलचा मृत्यू झाला. लहान मुलींचा आधार गेल्याने भारती हादरून गेली. आता पतीशिवाय या मुलींना वाढवायचे कसे, असा प्रश्न तिच्यापुढे उभा ठाकला. मात्र मुलीकडे बघून तिने जगण्यासाठी संघर्ष सुरू केला. मोठ्या हिंमतीने दोन्ही मुलींना सांभाळत असताना मात्र भारतीला आजार जडला. चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता तेथील डॉक्टरांनी चुकीचे निदान केल्याने आजार बरा होण्याऐवजी वाढला. त्यानंतर नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात उपचार केला. तेथे जवळचा सर्वच पैसा खर्च झाला. एवढे पैसे खर्च करूनही प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही.
तब्बल सहा महिने मृत्यूशी झुंज देत भारती जगण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र तिची प्रकृती इतकी गंभीर झाली की, तिच्या जगण्याची आशाच मावळली. काही दिवसातच तिने तन्वी आणि गौरी या दोघींसह जगाचा कायमचा निरोप घेतला. वडिलांचे अपघाती निधन झाले. आईचा आजारपणात मृत्यू झाला. त्यामुळे आता तन्वी व गौरी निराधार झाल्या. ६५ वर्षीय आजी बेबीबाई आयतवार या त्यांच्यासाठी आता आधार उरला आहे. पण पुढे जगायचे कसे? असा प्रश्न त्या दोघीसमोर उभा ठाकला आहे.