कष्ट करूनही त्या मजुरांची दिवाळी अंधारातच
By Admin | Updated: November 6, 2016 00:58 IST2016-11-06T00:58:15+5:302016-11-06T00:58:15+5:30
नलेश्वर परिसरात गिट्टी व बोल्डर अवैध उत्खनन प्रकरणात संबंधीत कंत्राटदाराने अनेक मजुरांना कामावर घेऊ..

कष्ट करूनही त्या मजुरांची दिवाळी अंधारातच
कारवाईच नाही : नलेश्वर परिसरातील गिट्टी व बोल्डर अवैध उत्खननप्रकरण
मोहाळी (नलेश्वर) : नलेश्वर परिसरात गिट्टी व बोल्डर अवैध उत्खनन प्रकरणात संबंधीत कंत्राटदाराने अनेक मजुरांना कामावर घेऊन गिट्टी व बोल्डरचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करवून घेतले. काबाडकष्ट करणाऱ्या त्या मजुरांचे मजुरी कंत्राटदाराने न दिल्यामुळे अखेर कष्ट करूनही त्या मजुरांची दिवाळी अंधारातच गेली.
नलेश्वर परिसरात गौण खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात कोणताही उद्योग व कारखाना नसल्यामुळे या परिसरातील मजूर शेतीच्या हंगामानंतर कंत्राटदाराकडे गौण खनिज उत्खनन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करतात. कंत्राटदार पुरुषोत्तम वासेकर रा. डोंगरगाव, ता. मूल जि. चंद्रपूर यांनी सिंदेवाही महसूल विभागाकडून गिट्टी व दगडाचे उत्खनन करण्यासाठी व तिची वाहतूक करण्यासाठी रॉयल्टी व वाहतूक परवाना घेतला असता महसूल विभागाने संबंधित कंत्राटदाराला नलेश्वर येथे गट नं. १५ आराजी २६.९९ या गट नंबरमध्ये ००.२० आर. हेक्टर जमिन १७ सप्टेंबर २०१६ ते २७ आॅक्टोबर २०१६ या कालावधीपर्यंत दिले. यात मजुरांना अग्रीम म्हणून काही पैसे दिले. तर उर्वरित मजुरी दिवाळी पूर्वीच देण्याचे ठरविले. ६० ते ७० मजुरानीही १७ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर २०१६ पर्यंत आपली व आपल्या मुलाबाळांची दिवाळी साजरी होईल, या आशेने पोटाला चिमटे घेऊन हे अंग मेहनतीचे काम करू लागले. १७ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर या कालावधीपर्यंत संबंधीत कंत्राटदाराने मजुरांकडून गिट्टी व दगडाचे अवैधपणे उत्खनन करून १०० ब्रासपेक्षा अधिकचे वाहतूक दिवसा व रात्री सर्रासपणे केली. तसेच मुदतीनंतरही गिट्टी व दगडाचे उत्खनन सदर कंत्राटदाराने सुरूच ठेवले.
या अवैधपणे चालणाऱ्या उत्खननाकडे व वाहतुकीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होते की काही हितसंबंध होते, हे न उलगडणारे कोडेच आहे. सदर कंत्राटदाराचे दिवाळी पूर्वीच दिवाळे निघत असल्याने त्यानी दिवाळीसाठी कोणत्याही मजुराचे मजुरीच दिली नसल्याचे १० ते १५ मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे नाव न टाकण्याच्या अटीवर सां़गितले. पोटाची खळगी भरण्यासाठी चिमटे घेऊन अंगमेहनतीचे काम करणाऱ्या मजुरांची मजुरी सदर कंत्राटदाराने न दिल्याने अखेर या ६० ते ७० मजुरांची दिवाळी अखेर दिव्याविना अंधारातच गेली. (वार्ताहर)
तो गिट्टीचा अवैध साठा चोरी जाण्याची शक्यता
सदर कं त्राटदाराने मुदतबाह्य २०० ते २५० ब्रास गिट्टीसाठा अवैधपणे उत्खनन केला. ते उत्खनन स्थळ गावापासून दोन कि.मी. अंतरावर असून ते जंगलात आहे. त्या गिट्टी साठ्यावर अनेक कंत्राटदाराचा डोळा असून तो चोरी जाण्याची शक्यता आहे. त्या गिट्टी साठ्यावर महसूल विभागाने पाळत ठेवण्याची गरज असून लवकरात लवकर पंचनामा करून त्याचा लिलाव केल्यास शासनाच्या तिजोरीत भर पडेल.
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी महसुलाचे चार कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट दिलेले असून मागेल त्याला गौण खनिज उत्खननासाठी व त्याची वाहतूक करण्याची परवानगी देण्याचे धोरण आखलेले आहे. आमचे कोणत्याही कंत्राटदारशी हित साधण्याचा संबंधच येत नसल्याचा खुलासा सिंदेवाहीचे तहसीलदार भास्कर बांबोळे यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना केला.