मुनगंटीवार यांनी एक रूपयाच्या नाण्यांनी भरली अनामत रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:01:05+5:30
लाल पिशवीत नाणी भरलेली सदर रक्कम अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आली. असा प्रकार जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडला. ही पूर्ण रक्कम मोजण्याला किती वेळ गेला व किती कर्मचारी लागले, ही गोष्ट अलविदा! परंतु, या शिक्क्यांमुळे मुनगंटीवार यांचे नामांकन अर्ज राज्यात चर्चेचा विषय ठरले होते. काँग्रेसकडून राहुल पुगलिया यांनी नामांकन दाखल केल्यानंतर येथील श्री बालाजी मंदिरात दर्शनाकरिता गेले.

मुनगंटीवार यांनी एक रूपयाच्या नाण्यांनी भरली अनामत रक्कम
वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : चंद्रपूर मूल - सावली या दोन विधानसभा क्षेत्राचे पुनर्गठन करून नव्याने बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यानंतर पहिली निवडणूक २००९ ला झाली. विधानसभेचे मुख्यालय असलेल्या बल्लारपूर येथील तहसील कार्यालयात निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज पार पडले. या क्षेत्राच्या पहिल्या निवडणुकीत भाजपकडून विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसकडून राहुल पुगलिया उभे होते. त्यावेळी ना. मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांनी अनेकांच्या घरोघरी जाऊन प्रत्येकी एक रूपयाप्रमाणे अनामत रक्कम जमा केली होती. मुनगंटीवार हे बल्लारपूर क्षेत्राचे पहिले आमदार म्हणून निवडून आले.
भाजपचे सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसचे राहुल पुगलिया यांनी आपापले नामांकन एकाच दिवशी, शेवटच्या क्षणी दाखल केले होते. यात महत्त्वाचे असे की, नामांकनाची अनामत रक्कम ना. मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सामान्यांकडून प्रत्येकी एक रूपया गोळा केला. ही रक्कम भरायला जाताना मिरवणूक काढण्यात आली.
लाल पिशवीत नाणी भरलेली सदर रक्कम अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आली. असा प्रकार जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडला. ही पूर्ण रक्कम मोजण्याला किती वेळ गेला व किती कर्मचारी लागले, ही गोष्ट अलविदा! परंतु, या शिक्क्यांमुळे मुनगंटीवार यांचे नामांकन अर्ज राज्यात चर्चेचा विषय ठरले होते. काँग्रेसकडून राहुल पुगलिया यांनी नामांकन दाखल केल्यानंतर येथील श्री बालाजी मंदिरात दर्शनाकरिता गेले. त्यानंतर थोड्याच वेळाने मुनगंटीवार हेही त्याच मंदिरात गेले होते. त्यामुळे मंदिर परिसरात पुगलिया व मुनगंटीवार हे समोरासमोर आले. दरम्यान, दोघांनीही एकमेकांकडे बघून स्मितहास्य करून हस्तांदोलनही केले होते. दोन कडव्या प्रतिस्पर्ध्यांमधील हा प्रसंग बघून काहींना सुखद आश्चर्याचा धक्का बसला, तर काहींच्या कपाळावर आठ्या पडल्याचे उपस्थितांना पाहायला मिळाले होते.