उमेदवारांची अनामत रक्कम बँँकेत जमा होणार
By Admin | Updated: October 8, 2015 00:40 IST2015-10-08T00:40:54+5:302015-10-08T00:40:54+5:30
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांची परत मिळणारी अनामत रक्कम उमेदवारांच्या नावे चेकद्वारे तर निवडणुकीत सहभागी कर्मचाऱ्यांचा मोबदला ...

उमेदवारांची अनामत रक्कम बँँकेत जमा होणार
ग्रामपंचायत निवडणूक : तक्रारींना बसणार लगाम
प्रवीण खिरटकर वरोरा
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांची परत मिळणारी अनामत रक्कम उमेदवारांच्या नावे चेकद्वारे तर निवडणुकीत सहभागी कर्मचाऱ्यांचा मोबदला त्यांच्या बँक खात्यात यावर्षी प्रथमच जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे रक्कम मिळाली नाही किंवा कमी मिळाली याबाबतच्या तक्रारींना लगाम बसणार आहे.
निवडणुकीमध्ये सहभागी असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीचे काम संपल्यानंतर त्याच दिवशी तात्काळ त्यांचा मोबदला देण्यात येतो. परंतु मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना पाच वर्षांचा कालावधी लोटुनही आजतागायत मोबदला मिळालेला नाही. मात्र तरीही यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्पर होते.
मागील ग्रामपंचायत निवडणुकीत अत्यल्प रक्कम तालुकास्तरावर प्राप्त झाल्यानंतर ती वाटण्यात आली. त्यानंतरही रक्कम प्राप्त झाली नसल्याने निवडणुकीत सहभागी अनेक कर्मचारी मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यामुळे यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत मोबदला मिळणार की नाही, याबाबत कर्मचारी सांशक होते. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सहभागी कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात आला होता. मात्र यामध्ये मोबदला घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारीची दखल घेत येत्या कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना यानंतर मोबदला त्यांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या प्रशिक्षणाच्या प्रारंभीच सहभागी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत द्यावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना बँक खाते पासबुकची झेरॉक्स प्रत मागविणे सुरू केले आहे.