नागभीड येथे बांधकाम खात्याचे विभागीय कार्यालय
By Admin | Updated: March 18, 2016 01:02 IST2016-03-18T01:02:56+5:302016-03-18T01:02:56+5:30
येथे मंजूर झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

नागभीड येथे बांधकाम खात्याचे विभागीय कार्यालय
इमारतीसाठी तीन कोटींचा निधी : मोठ्या कार्यालयाची प्रथमच उभारणी
नागभीड : येथे मंजूर झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या इमारतीसाठी ३ कोटी ११ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून १५ मार्च रोजी ही मान्यता मिळाली.
सार्वजनिक बांधकाम विभागात वाढलेल्या कामांची व्याप्ती तसेच चंद्रपूरपासून ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर आणि सिंदेवाहीचे अंतर लक्षात घेवून चंद्रपूर येथील सां. बा. विभागाचे विभाजन करण्यात यावे व नागभीड येथे विभागीय कार्यालय स्थापन करण्यात यावे, अशी फार जुनी मागणी होती. चिमूर-नागभीड विधानसभा मतदार संघातून आमदार कीर्तीकुमार भांगडिया निवडून आल्यानंतर त्यांनी या मागणीचा पाठपुरावा केला आणि त्याचे फलीत म्हणून सहा महिन्यांपूर्वीच या विभागाला मान्यता देण्यात आली होती.
या मान्यतेनंतर आता इमारतीच्या बांधकामालाही मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. विभागीय कार्यालयासोबतच उपविभागीय कार्यालयाचे सुद्धा बांधकाम होणार आहे. यासाठी ३ कोटी १० लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी कोणत्या हेडवर किती खर्च करायचा याच्या अटी आणि शर्ती सुद्धा आखून देण्यात आल्या आहेत. या अटी आणि शर्तीनुसार मुख्य इमारत आणि इतर स्थापत्य कामे २ कोटी १९ लाख १२ हजार ६५० रुपये, आकस्मिक खर्च ८ लाख ७६ हजार रुपये, अंतर्गत विद्युतीकरण १० लाख ९५ हजार रुपये, बाह्य पाणी पुरवठा व मलनिस्सारण १० लाख ९५ हजार, गार्डनिंग व जमीन सुधारणा ५ लाख रुपये, मोटार शेड १० लाख रुपये, बाह्यविद्युतीकरण १३ लाख १५ हजार रुपये, पंप हाऊस ३ लाख रुपये, रेन वॉटर हार्वेस्टींग ३ लाख रुपये, अग्नीशमण यंत्रणा ५ लाख रुपये आणि भाववाढीवर २१ लाख ९१ हजार रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
इमारतीचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी कोणती काळजी घेण्यात यावी, यासंदर्भात अनेक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांपैकी अर्थसंकल्पात तरतुद झाल्याशिवाय प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येवू नये, या एका सूचनेचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे या निधीचा अर्थसंकल्पात केव्हा समावेश होतो, याकडे लक्ष वेधून राहणार आहे.