माथाडी कामगारांना काम देण्यास नकार
By Admin | Updated: December 26, 2015 01:20 IST2015-12-26T01:20:35+5:302015-12-26T01:20:35+5:30
मूल येथील कृषी बाजार समितीत काम करणाऱ्या माथाडी कामगारांची दिशाभूल करीत त्यांना काम देण्यास नकार

माथाडी कामगारांना काम देण्यास नकार
न्याय देण्याची मागणी : मूल बाजार समितीतील माथाडी कामगार वाऱ्यावर
चंद्रपूर : मूल येथील कृषी बाजार समितीत काम करणाऱ्या माथाडी कामगारांची दिशाभूल करीत त्यांना काम देण्यास नकार दिल्याने माथाडी कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मूल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी माथाडी कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमरण उपोषण केले. हे उपोषण करताना लोकशाही व शांततेचा मार्ग अवलंबिण्यात आला. या उपोषणादरम्यान बाजार समिती प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून बाहेरील अनोंदित कामगार कामावर लावले व त्यांच्याकडून कामे करवून घेतली. शासनाने याची दखल घेऊन माथाडी कायद्याची ३१ जानेवारी २०१५ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त बाजार समित्यात अंमलबजावणी करण्याची व मूल बाजार समितीत अंमल बजावणीची हमी दिली. तसेच कामगारांना पुर्ववत कामगार रुजू होण्याची विनंती केली. शासन व अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. परंतु कामावर रुजू झालेल्या माथाडी कामगारांना बाजार समिती प्रशासनाने काम देण्यास नकार दिला. याबाबत शासन अधिकारी यांना अवगत करण्यात आले. त्यांनी फक्त भ्रमणध्वनीद्वारे प्रशासनाला निर्देश दिले. या अधिकाऱ्यांचा आपल्या प्रशासनावर नियंत्रण व वचक नसल्यामुळे व उपोषणकर्त्यां कामगारांचा वैयक्तिक वचपा काढण्याच्या उदात्त हेतुने यांच्या निर्देशाला न जुमानता कामगारांना कामावरून वंचित केले.
माथाडी कामगारांना काम मिळवून देणे, कामगार उपलब्ध असून काम न मिळाल्यास मजुरी मिळवून देणे, कामाच्या ठिकाणी पुर्वी काम करीत असलेल्या कामगारांना प्राधान्याने काम मिळवून देणे ही जबाबदारी माथाडी मंडळाची असतानाही या बेदखल झालेल्या कामगारांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. माथाडी कायदा व माथाडी मंडळ माथाडी कामगारांना संरक्षण देणारे असूनही आज माथाडी कामगार असंरक्षित झाला आहे. पणन संचालक महाराष्ट्र यांचे प्रतिनिधी असलेल्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या निर्देशाला बाजार समिती प्रशासनापुढे किंमतच नसल्यामुळे ते ही कामगारांना न्याय देण्यास अपयशी ठरले आहे. माथाडी कायद्याची वारंवार मागणी करणाऱ्या कामगारांना डावलून त्या ठिकाणी माथाडी नोंदीत नसलेल्या कामगारांनी भरती करण्यात आली. संगनमताने माथाडी कामगारांना उपोषणापासून परावृत्त करुन त्यांना रोजगारापासून वंचित करण्याचा डाव असल्याचा आरोप माथाडी कामगारांचे नेते रमजान खान पठाण अशरफी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. (प्रतिनिधी)