विरूर परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ
By Admin | Updated: September 15, 2015 01:22 IST2015-09-15T01:22:04+5:302015-09-15T01:22:04+5:30
आंध्रप्रदेश सीमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील विरूर परिसरातील चिंचाळा येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू,

विरूर परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ
विरुर (स्टे.) : आंध्रप्रदेश सीमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील विरूर परिसरातील चिंचाळा येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाची साथ पसरली असून संपूर्ण परिसर तापाच्या विळख्यात सापडला आहे. चिंचाळा येथे आठ दिवसांत डेंग्यूसदृश्य आजाराने एकाचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतामध्ये गावचे पाटील सित्रु मडावी (६०) यांचा समावेश आहे. तर भिमराव वेंकटी कुळमेथे (२२) रा. चिंचाळा याची प्रकृती गंभीर आहे. परिसरातील चार गावे तापाच्या विळख्यात आहे. मात्र याकडे वैद्यकिय अधिकाऱ्यांचे कमालिचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.
राजुरा तालुक्यातील चिंचाळा, केळझर, भेंडाळा येथे बहुतांशी लोक शेतकरी, आदिवासी गरीब जनता वास्तव्यास आहे. मागील १५ दिवसांपासून परिसरात डेंग्यू मलेरियाची साथ पसरल्याने गरीब रुग्ण खासगी रुग्णालयाचा आसरा घेत असल्याचे दिसुन येत आहे. मात्र याकडे वैद्यकिय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे आदिवासी गरीब जनतेला अधिकचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. येथुन बारा कि.मी. अंतरावर चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांना आल्या पावली परतावे लागत आहे. परिणामी परिसरातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. आता चिंचाळा, केळझर, भेंडाळा येथे तापाची साथ पसरल्याने गावातील प्रत्येक घरी एक दोन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. आरोग्य विभाग थातुरमातुर उपचार करून रुग्णांना दिलासा देत आहे परंतु रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. गावकरी विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात दाखल होत असल्याचे दिसुन येत आहे. चिंचाळा गावात गंगुबाई दौलत गेडाम, भिमराव वेंकटी सिडाम, गंगाधर परचाके, सखुबाई परचाके, देवराव गेडाम, हनुमंतु मडावी, शेखु मारोती मडावी यांच्यासह अनेक रुग्ण खाटेवर पडून आहे. तसेच भेंडाळा येथील मंगेश ढवस, दत्तु ढवस, दादाजी शेळमाके, अविनाश ढवस, छाया ढवस यांचेसह केळझर गावकरी हे तापाने फणफणत आहे.चिंचोली (बु.) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र अधिकारी व कर्मचारी यांच्या उदासीनतेमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. (वार्ताहर)
सदर व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने व कशामुळे झाला हे आता सांगणे कठीण आहे. सगळीकडे डेंग्यू मलेरियाची साथ सुरू आहे. प्रत्येकांनी परिसर स्वच्छ ठेवावे व शुद्ध पाण्याचा वापर करावा. डासांचा प्रतिबंध करावा, कोरडा दिवस पाळावा, असे गावकऱ्यांना सांगितले. तसेच अबेड व अळीनाशक औषधांची फवारणी केली. रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले.
- डॉ. सुनील फुलझले, चिंचोली (बु), प्राथमिक आरोग्य केंद्र