घरेलू कामगार मोलकरणींची पेंशनसाठी सरकारविरुद्ध निदर्शने
By Admin | Updated: December 21, 2015 01:06 IST2015-12-21T01:05:49+5:302015-12-21T01:06:34+5:30
पेन्शन लागू करण्यात यावे, या मागणीसाठी घरेलू महिला कामगारांनी गुरूवारी येथे निदर्शने केली.

घरेलू कामगार मोलकरणींची पेंशनसाठी सरकारविरुद्ध निदर्शने
ब्रह्मपुरीत आंदोलन : कामगार महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
ब्रह्मपुरी : पेन्शन लागू करण्यात यावे, या मागणीसाठी घरेलू महिला कामगारांनी गुरूवारी येथे निदर्शने केली.
घरेलू कामगार मोलकरीण महिला अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत अगदी अत्यल्प रोजीमध्ये अनेकांच्या घरची भांडी, कपडे धुवून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु या अत्यल्प मिळणाऱ्या मानधनात संपूर्ण कुटूंब चालविणे या महिला मोलकरिण महिलेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणून आयटक संघटनेच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये २००४ पासून मोलकरणीच्या विविध मागण्यांना घेऊन सतत आंदोलने, मोर्चे, घेराव घालून, संघर्ष करून सरकारला शेवटी २०११ मध्ये घरेलू कामगार मोलकरीण कल्याणकारी मंडळाची निर्मिती करण्यास भाग पाडले. तेव्हापासून नोंदणीकृत मोलकरीणला विविध योजनांचा लाभ मिळू लागला, परंतु हल्ली वाढत्या महागाईनुसार सरकारने काही नवीन योजना घोषित करून मोलकरणी महिलांना द्यायला पाहिजे. परंतु सरकार याकडे नेहमी दुर्लक्ष करीत आहे. म्हणून प्रलंबीत मागण्यांना घेऊन आयटक संलग्न घरेलू कामगार मोलकरीण संघटनेच्या वतीने ब्रह्मपुरी येथील हुतात्मा स्मारकासमोर मोलकरिण महिलांना वयाच्या ६० वर्षानंतर किमान तीन हजार रुपये पेंशनचा कायदा करावा. या मागणीला घेऊन सरकारविरुद्ध निदर्शने केली.
स्थानिक हुतात्मा स्मारक येथे १७ डिसेंबर २०१५ ला आयटक संघनेच्या वतीने घरेलू कामगार मोलकरीन महिलांचा तालुकास्तरीय मेळावा तालुकाध्यक्ष कुंदा कोहपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, पुरुषोत्तम ढोरे, दुर्गा नान्हे, मिरा ढोरे, शशिकला वासनिक आदी उपस्थित होत्या. यामध्ये विनोद झोडगे यांनी नोंदणीकृत घरेलू कामगार मोलकरीन महिलांना विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये वयाची ५५ वर्षे पूर्ण झालेल्या मोलकरीणला दहा हजार रुपये सन्मानधन दिले जाते. मोलकरीणच्या वारसाला मोलकरीणच्या मृत्यूनंतर तीस हजार रुपये व दोन हजार रुपये अंत्यविधीला दिला जातो. मोलकरीणचा अपघाती मृत्यू झाल्यास ३७ हजार ५०० रुपये दिल्या जातो व कायमचे अपंगत्व आल्यास पाच हजार रुपये दोन अपत्यासाठी दिला जातो. (शहर प्रतिनिधी)