दोषी प्रभारी शिक्षणाधिकार्‍याला निलंबित करण्याची मागणी

By Admin | Updated: May 19, 2014 23:22 IST2014-05-19T23:22:18+5:302014-05-19T23:22:18+5:30

शाळांची वार्षिक तपासणी करताना आपल्या पतीच्या मदतीने चिरीमिरीचे व्यवहार करीत खोटे तपासणी अहवाल सादर करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याचे

The demand for suspension of the accused in charge of the Education Officer | दोषी प्रभारी शिक्षणाधिकार्‍याला निलंबित करण्याची मागणी

दोषी प्रभारी शिक्षणाधिकार्‍याला निलंबित करण्याची मागणी

चंद्रपूर : शाळांची वार्षिक तपासणी करताना आपल्या पतीच्या मदतीने चिरीमिरीचे व्यवहार करीत खोटे तपासणी अहवाल सादर करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने दोषी प्रभारी शिक्षणाधिकारी (निरंतर) हर्षदा खेरकर यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण उपसंचालक नागपूर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

शैक्षणिक सत्र २0१३-१४ मध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्य) यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी हर्षदा खेरकर (निरंतर) यांना माध्यमिक शाळांची वार्षिक तपासणी करण्याचे निर्देश दिले. उपरोक्त निर्देश प्राप्त होताच, हर्षदा खेरकर प्रभारी शिक्षणाधिकारी यांनी माध्यमिक शाळांची वार्षिक तपासणी करणे सुरू केले. तपासणीला जाताना त्या कधीच कार्यालयीन कर्मचारी सोबत नेत नसत वा कार्यालयाचे शासकीय वाहन वापरत नसत. त्यांचे पती मात्र सदैव सोबत असायचे. तपासणीचे काम सुरू झाले की, खेरकर यांचे पती त्या शाळेतील शिक्षकांना हेरून, तुमच्या शाळेत त्रुट्या आहेत. याबाबी तपासणी अहवालात आल्या तर तुमच्या शाळेची मान्यता जावू शकते, तुम्ही सेटलमेंट करा, असे धमकावून १५ ते २0 हजारावर सौदा करत व खोटा तपासणी अहवाल तयार करून शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प. चंद्रपूर यांना सादर करीत असत अशा तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्यामुळे संघटनेने पत्र देवून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्याकडे चौकशीची मागणी केली. ५ डिसेंबर २0१३ च्या पत्राचे अनुषंगाने शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग, नागपूर यांनी शिक्षणाधिकारी (माध्य) यांना आदेश देवून वरील शाळांची पुनर्तपासणी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

शिक्षणाधिकार्‍यांनी तीन शाळांची पुनर्तपासणी केली. त्यांनी शिक्षण उपसंचालक यांना अहवाल सादर केला. त्यात शाळेत आलेल्या बाबी व तपासणी अहवाल नमूद बाबीमध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत दिसून आली आहे. तपासणी अधिकारी व पथकातील सदस्यांनी काही शाळेत ज्या बाबी आहेत. त्या बाबी अहवालात नसल्याचे दर्शविले आहे, तर काही शाळेत ज्या बाबी नाहीत, त्या बाबी अहवालात असल्याचे दर्शविलेले आहे. यावरुन तपासणी अधिकार्‍याने या कार्यालयाची व विभागाची दिशाभूल केलेली आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे संबंधित अधिकार्‍याविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करावी, असा स्पष्ट अहवाल २१ एप्रिलला शिक्षण उपसंचालक नागपूर यांना सुपूर्द केला. अधिकारी दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना त्वरित निलंबीत करण्याची मागणी वरिष्ठ अधिकार्‍यांना पत्राद्वारे केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह रामदास गिरटकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The demand for suspension of the accused in charge of the Education Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.