चंद्रपूर शहरातील जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी
By Admin | Updated: November 13, 2014 23:00 IST2014-11-13T23:00:29+5:302014-11-13T23:00:29+5:30
शहरातील वाढते अपघात लक्षात घेता शहरातून होणारी जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

चंद्रपूर शहरातील जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील वाढते अपघात लक्षात घेता शहरातून होणारी जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
चंद्रपूर शहरातील प्रमुख महाविद्यालय, हॉस्पीटल, शासकीय तसेच खासगी कार्यालय असलेल्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरून नागपूर, बल्लारपूर, मूल, सीटीपीएसकडे जाणारी जडवाहतूक दिवसरात्रं सुरू असल्याने अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. अपघातात युवक, युवती, शाळकरी मुला, मुलींचे नाहक बळी जात आहेत. आतापर्यंत या मार्गावर ५०० पेक्षा अधिक नागरिकांचे जडवाहतुकीमुळे मृत्यू झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. परिणामी नागरिकांमध्ये जडवाहतुकीच्याविरोधात संताप निर्माण झाला आहे. नागरिकांच्या भावनांची दखल घेत मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी यापूर्वी वेळोवेळी अनेक आंदोलन केली आहे. पोलीस प्रशासन जडवाहतुकीमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यबाबत गंभीर नसल्याने आतापर्यंत शासकीय नियमानुसार जडवाहतुकी विरोधात कारवाई करण्यास कुचराई करीत आहे. जडवाहतुकीमुळे चंद्रपुरतील जनतेचा नाहक बळी जात आहे. वरोरा नाका उडाणपुलाच्या बांधकामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चंद्रपुरातील नागपूर रोड, बंगाली कॅम्प, तुकूम रोडवर महाविद्यालय, शाळा, हॉस्पीटल, हॉटेल, शासकीय, खाजगी कार्यालय, व्यापारी प्रतिष्ठान असल्याने रस्त्यावर अत्यंत वर्दळ असते. यात महाविद्यालयीन, शाळेतील तरुण, तरुणी, लहान मुल, मुलींचा समावेश आहे. नागपूर, बल्लारपूर, मूल, सिटीपीेस मार्गाने धावणाऱ्या जडवाहतूक तरुण, शाळकरी मुल, मुलींचा अपघातात बळी घेत आहे. नियमाचे उल्लंघन करून जडवाहतूक सर्रासपणे सुरू आहे. जडवाहतुकीवर ठोस कारवाई केली जात नाही. जडवाहतूकीच्या विरोधात थातूरमातूर कारवाई करून पोलीस प्रशासन कारवाई करीत असल्याचे भासवित आहे. कडक कारवाईचा धाक नसल्याने येथील ट्रान्सपोर्ट मालक निर्ढावले आहेत. अपघाती मृत्यू ही एक मोठी गंभीर समस्या चंद्रपूर शहरवासियांची झाली आहे. अपघाताच्या घटनांवर आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून मनसेने आतापर्यंत अनेकदा पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. चंद्रपूर शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्याने जडवाहतुकीस कायमस्वरूपी बंद केल्यास अपघाती मृत्यू टाळता येऊ शकतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन अपघाती मृत्यूबाबत गंभीर नाही, ही बाब चंद्रपुरकरांसाठी अतिशय दुर्दैवाची आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने जडवाहतूक विरोधात कडक पावले उचलावी, वर्दळीच्या मार्गावरील जडवाहतूक कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी मनसच्यावतीने करण्यात आली आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)