ग्रामीण बँक सुरू करण्याची मागणी
By Admin | Updated: July 3, 2015 01:23 IST2015-07-03T01:23:29+5:302015-07-03T01:23:29+5:30
देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सुरळीत व्यवहार सुरू असताना सन २००९ मध्ये सदर बँक शाखा बंद करण्यात आली.

ग्रामीण बँक सुरू करण्याची मागणी
शाखा अचानक बंद : नागरिकांना सोसावा लागते आर्थिक भुर्दंड
देवाडा : देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सुरळीत व्यवहार सुरू असताना सन २००९ मध्ये सदर बँक शाखा बंद करण्यात आली. परिणामी नागरिकांना व्यवहार करण्यासाठी देवाडा परिसरातील २५ गावातील नागरिकांना २५ ते ३० कि.मी. राजुरा येथे जावे लागत आहे. यात नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
या आदिवासी दुर्गम भागात देवाडा हे मोठे गाव असल्यामुळे २५ गावे देवाडा या गावाच्या संपर्कात आहेत. रविवारी या ठिकाणी मोठा बाजार भरतो. अनेक वर्षांपासून हा बाजार व्यवस्थित सुरू आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँक नसल्यामुळे कोणत्याही लहान मोठे कामानिमित्त राजुरा येथे जावे लागते. महिला बचतगट यांना दरमहा रक्कम उचल करणे व भरण्यासाठी व कर्ज घेण्यासाठी दरवर्षी बँकेत जावे लागते. तसेच शेतकऱ्यांना कर्ज फेडणे, कर्ज घेणे यासाठी बँकेत खाते उघडणे, निराधार, श्रावणबाळ, संजय गांधी इंदिरा गांधी योजनांचा लाभ घेणे, अपंग व वायोवृद्ध नागरिकांना बँकेतून रक्कम घेण्याकरिता २५ ते ३० कि.मी. तुडवत जावे लागते. यात त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.
शासनाच्या जीआरनुसार आॅनलाईन पद्धत झाल्यामुळे जनधन योजना असो किंवा शौचालयाचे बांधकाम झालेली रक्कम किंवा तेंदुपत्ता रक्कम अशा कोणत्याही योजना असो बँकेत नागरिकांना आपले सेविंग खाते लिंकीग करावे लागते. यासाठीआपले महत्त्वाचे कार्य सोडून राजुराकडे धाव घ्यावी लागते. देवाडा सर्कलमध्ये ७० टक्के शेतकरी असून त्यांचे जीवन शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र बँकेच्या कामासाठी गेले की, त्यांचा दिवस व्यर्थ जातो. एका फेरीत काम झाले तर ठिक अन्यथा परत दुसऱ्या दिवशी पुन्हा राजुऱ्यात जावे लागते. त्यामुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)