नऊ लाख ८६ हजार पाकीटस् बीटी कापूस बियाणांची डिमांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST2021-05-06T04:30:00+5:302021-05-06T04:30:00+5:30
चंद्रपूर : कोरोना उद्रेक रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांमुळे शेतमालाची साखळी तुटली, तर दुसरीकडे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. ...

नऊ लाख ८६ हजार पाकीटस् बीटी कापूस बियाणांची डिमांड
चंद्रपूर : कोरोना उद्रेक रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांमुळे शेतमालाची साखळी तुटली, तर दुसरीकडे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जि. प. कृषी विभागाने तब्बल नऊ लाख ८६ हजार ४४४ पाकीटस् बीटी कापूस बियाणांची डिमांड राज्याच्या कृषी आयुक्तांकडे केली आहे.
मागील वर्षी कोरोना लॉकडाऊन काळात कृषी क्षेत्राचा अपवाद वगळल्यास मोठ्या उद्योगांसह सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रचंड फटका बसला होता. जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांना टाळे लागले असताना कृषी क्षेत्राने मात्र उत्पादनात आघाडी घेतली होती. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला होता. जिल्ह्यातील ७० टक्के जनता आजही शेतीवर अवलंबून आहे. कोरोना निर्बंधांमुळे यंदाही विविध व्यवसाय बंद पडले. सुमारे दीड हजार कोटींचे व्यवहार अडचणीत सापडले. १५ मे पर्यंत निर्बंध कायम असल्याने संकटे पुन्हा वाढतील. ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरू झाला आहे; परंतु खरीप मशागत थांबली नाही. त्यामुळे कृषी विभागानेही भात, विविध कडधान्ये, तसेच कापूस व सोयाबीन लागवडीचे वाढीव क्षेत्र लक्षात घेतले. त्यानुसारच कृषी आयुक्तांकडे जिल्ह्यासाठी ६ लाख ७१ हजार २० मेट्रिक टन बियाणांची मागणी नोंदविली. त्यामध्ये सर्वाधिक सोयाबीन, भात, तूर आणि बीटी कापूस बियाणांचा समावेश आहे.
बोंडअळीची साखळी तुटलीच नाही
जिल्ह्यात २०१७ पासून कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला. तेव्हापासून २०१७ ते २०२० पर्यंत बोंडअळीचे संकट कायम आहे. जिल्ह्यातही गतवर्षी या अळीच्या प्रकोपाने कपाशीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे बोंडअळीचा जीवनक्रम खंडित करण्यासाठी अन्य उपायांसोबतच हंगामपूर्व लागवड करू नये, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
एक जूनपासून बियाणे विक्री
शेतकऱ्यांनी हंगामाच्या आधीच कापूस बियाणे लागवड केल्यास बोंडअळीच्या पुनरुत्पत्तीचा धोका आहे. यासाठी शेतकऱ्यांना एक जूनपासून बियाणे विक्री करण्याच्या सूचना कृषी आयुक्तांनी दिल्या. उत्पादक ते कंपनी वितरक, वितरक ते किरकोळ विक्रेता किरकोळ विक्रेता ते शेतकरी असे एक वेळापत्रकच जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यात एक जूनपासून अधिकृत बियाणे विक्री सुरू होणार आहे. याच संधीचा गैरफायदा घेण्यासाठी तेलंगणा व आंध्र प्रदेशातून बोगस बियाणे आणून विकणाऱ्या टोळ्या जिल्ह्यात सक्रिय झाल्याचा अंदाज आहे.
एक लाख ३८ हजार टन खत आवंठन
खरीप हंगामासाठी जि. प. कृषी विभागाने एक लाख ७७ हजार ४८० मेट्रिक टन खताची मागणी कृषी आयुक्तांकडे केली होती. त्यापैकी एक लाख ३८ हजार ३०० मेट्रिक टन खत आवंठन झाले. यामध्ये युरिया, डीएपी एसएसपी, एमओपी संयुक्त खतांचा समावेश आहे.
बियाणेनुसार मागणी (मेट्रिक टन)
भात २८२००
ज्वारी २०९
तूर २८००
मूग १७
उडीद २७
सोयाबीन ३१४४३
तीळ १५
प्रकारानुसार मंजूर खत (मेट्रिक टन)
युरिया ५०६९०
डीएपी १४२८०
एसएसपी ३१७९०
एमओपी ३२१०
संयुक्त ३८३३०