व्याहाड येथील मुरुम, गिट्टी उत्खनन लीज रद्द करण्याची मागणी
By Admin | Updated: October 10, 2015 00:10 IST2015-10-10T00:10:51+5:302015-10-10T00:10:51+5:30
सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला असून गावालगत असलेल्या डोंगरावरील वैध व अवैध उत्खनन लिज रद्द करण्याची मागणी रेटून धरली आहे.

व्याहाड येथील मुरुम, गिट्टी उत्खनन लीज रद्द करण्याची मागणी
नैसर्गिक सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर : खनिज निधीतून गावाला वगळले
उपरी : सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला असून गावालगत असलेल्या डोंगरावरील वैध व अवैध उत्खनन लिज रद्द करण्याची मागणी रेटून धरली आहे. तसेच गावातील जिल्हा परिषदेचे कर्मचारी मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
व्याहाड (बुज) हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. येथे शाळा, कॉलेज, बँक, दवाखाना असे अनेक शासकीय कार्यालये आहेत. मुख्य म्हणजे व्याहाड बुज गावाच्या सभोवताल डोंगराने व्यापले असल्याने नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. मात्र ३० वर्षांपासून येथील डोंगरावर वैध व अवैध खोदकाम करून अवैधरित्या मुरुम गिट्टी वाहतूक केली जात आहे. यामुळे डोंगरी परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. खनिज विभागाने व्याहाड (बुज) च्या डोंगरावर खोदकामासाठी परवाना दिला असल्याने या डोंगराचे खोदकाम होत आहे. परिणामी व्याहाड (बुज) ला लाभलेली निसर्गाची ओळख नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खनिज विभागाने येथील लिज रद्द करावी, आणि गावात जिल्हा परिषदेचे कर्मचारी मुख्यालय राहावे यासाठी ग्राम पंचायतने ठराव घेवून संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देवून मागणी केली आहे.
३० वर्षांपासून व्याहाड (बुज) येथे वैध, अवैध रित्या गिट्टी, मुरुमाचे उत्खनन होत आहे. परंतु अजूनपर्यंत व्याहाड (बुज) ग्राम पंचायतीला गौण खनिज विकास निधी मिळालेला नाही. तो निधी संबंधित विभागाने द्यावा, अशी मागणी सरपंच शिला पाटील, उपसरपंच योगेश बोमनवार, ग्रा.पं. सदस्य अनिल देवतळे, कुकसू गेडाम, प्रिया मोटघरे, वर्षा मोहुर्ले, सुधीर वासेकर यांनी केली आहे. (वार्ताहर)