विमुक्त भटक्या जमातीला घरकुल देण्याची मागणी
By Admin | Updated: March 13, 2015 00:58 IST2015-03-13T00:58:53+5:302015-03-13T00:58:53+5:30
तालुक्यात सध्याच्या परिस्थितीत शासन केवळ एससी, एसटी लाभार्थ्यांना घरकुल देत असून विमुक्त भटक्या जमातीतील लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत आहेत.

विमुक्त भटक्या जमातीला घरकुल देण्याची मागणी
चिमूर : तालुक्यात सध्याच्या परिस्थितीत शासन केवळ एससी, एसटी लाभार्थ्यांना घरकुल देत असून विमुक्त भटक्या जमातीतील लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत आहेत. तालुक्यातील विमुक्त भटक्या जमातीतील लाभार्थ्यांनाही घरकुल देण्याची मागणी एकलव्य सेनेचे डॉ. दिलीप शिवरकर यांनी केली आहे.
मागील दहा वर्षापासून घरकुल संदर्भात शासनाचे विमुक्त भटक्या जमातीसाठी कृती कार्यक्रम नाही. संपूर्ण जिल्ह्यात मच्छिमार संस्था असून त्या संस्थाना घरकुल देण्यात आले नाही. महाराष्ट्र शासनाने आरक्षनानुसार घरकुल प्रणाली सुरू करावी, जातवार लोकसंख्या निर्धारण करुन त्यानुसार दारिद्ररेषेखालील घरकुल देण्यात यावे, असे शिवरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
स्वातंत्र्यकाळापासून आजपर्यंत विमुक्त भटक्या जमातीतील नागरिकांचे राहनीमान उंचावले नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शेकडो बीपीएलधारक लाभार्थी घराचे बांधकाम करु शकत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित रहावे लागत आहे.
शासनाने चिमूर तालुक्यातील विमुक्त भटक्या जमातीतील लाभार्थ्यांना घरकुलासाठी अनुदान देण्याची मागणी डॉ. दिलीप शिवरकर, प्रकाश नान्हे, मिलिंद भनारे, रामदास हेमके, सह एकलव्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
विमुक्त भटक्या जमातीच्या समस्यांकडे शासनाचे सतत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या जमातीच्या नागरिकांना दारिद्र्याचे जीवन जगावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)