कोरपना येथे गॅस एजन्सीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST2021-03-23T04:30:12+5:302021-03-23T04:30:12+5:30
कोरपना : कोरपना तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र, अधिकृत गॅस एजन्सी नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. येथे अधिकृत गॅस ...

कोरपना येथे गॅस एजन्सीची मागणी
कोरपना : कोरपना तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र, अधिकृत गॅस एजन्सी नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. येथे अधिकृत गॅस एजन्सी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कोरपना येथे अधिकृत गॅस एजन्सी नसल्याने गॅस कनेक्शधारकांना ५० किलोमीटर अंतरावरील बल्लारपूरला जावे लागते. येथील एजन्सी आठवड्यातून एकच दिवस सुरू राहत असल्याने नागरिकांना अनेकवेळा परत जावे लागते. गॅस कनेक्शनविषयी काही अडचणी निर्माण झाल्यास बल्लारपूरलाच जावे लागते. त्यामुळे येथे अधिकृत एजन्सी देऊन ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोरपना-उमरेड बसची मागणी
चंद्रपूर : कोरपना येथून वणी-चिमूरमार्गे उमरेड बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या बससेवेमुळे कोरपना येथील नागरिकांसह वणी, वरोरा, चिमूर परिसरातील प्रवाशांना सोयीचे होईल. यासंदर्भात आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे.
गावफलक लावण्याची मागणी
कोरपना : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र, यातील बहुतांश रस्त्यांवर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असते. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात आली आहे.
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ
राजुरा : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. ही कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार करीत असून, ती रस्त्यावर इकडे-तिकडे भटकत असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्याकडेला ही कुत्री कळपाने असतात. अनेकवेळा रात्री दुचाकींच्यामागे कुत्री धावतात. ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
धूर फवारणी करण्याची मागणी
वरोरा : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाने डासांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही मोकळ्या भूखंडावर कचऱ्याचे साम्राज्य आहे. याकडेही लक्ष देण्याची मागणी आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
नवरगाव : नवरगाव-रत्नापूर येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. नवरगाव-रत्नापुरातील विद्युत पुरवठा वारंवर खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागते.
अवैध वाहतुकीला आळा घालावा
जिवती : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहे. मागील आठवड्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काही दिवसातच ही मोहीम थंड झाली. अवैध वाहतुकीला जोर आला आहे. याला तातडीने आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.