नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी
By Admin | Updated: December 7, 2014 22:48 IST2014-12-07T22:48:34+5:302014-12-07T22:48:34+5:30
अपुरा पाऊस, अकाली पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे यावर्षी राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. हिच स्थिती चंद्रपूर जिल्ह्याची आहे. धान शेतीबरोबरच सोयाबीन व कापसाचे

नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी
मूल : अपुरा पाऊस, अकाली पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे यावर्षी राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. हिच स्थिती चंद्रपूर जिल्ह्याची आहे. धान शेतीबरोबरच सोयाबीन व कापसाचे पीक घटले असून शेतकरी संकटात सापडलेला आहे. यासाठी संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी मूल तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने तहसिलदार मूलच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
धान उत्पादक शेतकरी तसेच सोयाबीन व कापूस लागवडी करणारा शेतकरी यावर्षीच्या हंगामात अपुऱ्या पावसामुळे पुर्णत: खचला आहे. वर्षभर राबराब राबून व हजारो रुपये खर्च करून देखील खर्च केलेली रक्कम निघणे कठीण झाल्याची स्थितीत मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात देखील हिच परिस्थिती असून सन १९७२ पेक्षाही भयंकर स्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे ही शासनाची काळाची गरज आहे. यासाठी सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी तर कापसाला सहा हजार रुपये रक्कम राज्य शासनाने बोनस म्हणून देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच ओलिताच्या शेतकऱ्यांना व फळबागांना हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे, कापूस, सोयाबीन, धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तर ओलीत व फळबाग शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, कापूस सहा हजार, सोयाबीन पाच हजार व धानाला चार हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांचे पीक कर्ज व वीज बिल माफ करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी व रोजगार तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून संकटग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करण्याची मागणी काँग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष रावत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार, संजय मारकवार, विजय चिमड्यालवार आदी शेकडो शेतकरी उपस्थित होते. शासानाने नुकसानग्रस्तांना मदत जाहीर न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले. हिवाळी अधिवेशन सुरु होत असून अधिवेशनादरम्यान मदतीची घोषणा करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)