नंदारा येथील अतिक्रमण काढण्याची मागणी
By Admin | Updated: June 29, 2015 01:43 IST2015-06-29T01:43:47+5:302015-06-29T01:43:47+5:30
चिमूर तालुक्यातील नंदारा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मासळ तुकूम गावातील स्मशानभूमी व ढोरफोडीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे.

नंदारा येथील अतिक्रमण काढण्याची मागणी
१० जुलैपासून बेमुदत उपोषण : प्रशासनाला दिले निवेदन
चिमूर: चिमूर तालुक्यातील नंदारा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मासळ तुकूम गावातील स्मशानभूमी व ढोरफोडीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाशी पत्रव्यवहार करुनही कारवाई केली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयासमोर १० जुलैपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी सरपंच सुनिल शेडामे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
मासळ तुकूम गावाची लोकसंख्या ६०० आहे. शासनाने स्मशानभूमीची जागा राखून ठेवली असताना येथील किसन कोसरे यांनी त्यावर अतिक्रमण केले होते. परंतु त्यावेळी नाल्याला पाणी असल्याने मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचण होती. एका महिलेच्या पार्थिवावर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या घटनेनंतर तत्कालिन तहसीलदारांनी यांनी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत १४ जुलै २००७ रोजी सर्वे क्र. ११८ आराजी ०.२३ हे.आर. एवढी जमिनीची स्मशानभूमीसाठी मोजणी करुन ती जागा खुली करण्यात आली होती. परंतु येथील सरपंचाच्या सहकार्याने देवीदास कोसरे यांनी पोकलँड मशीनने स्वत:च्या शेतातील माती स्मशानभूमीत टाकून मोठी पाळ टाकली. नंदारा तुकूम रस्त्याच्या पुलाची पाईपलाईन व शिवधुराची पाईपलाईन बुजविल्याने रस्त्यावर पाणी साचून रस्त्याची दैनावस्था झाली आहे.
गावातील कोही लोक मृत जनावरे मामा तलावात टाकत होते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. सन २०१३ मध्ये तहसीलदार व ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. तसेच सहा दिवस उपोषण करुन सर्व्हे ५५ आराजी १.०१ या जागेवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. या जागेवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश २४ डिसेंबर २०१३ काढण्यात आले. ११ आॅगस्ट २०१४ रोजी ग्रामपंचायतीने मोजणी करुन सीमांकन करुन पोल उभे केले.
मात्र ग्रामपंचायतीच्या सीमांकनाला न जुमानता जर्नाधन शेडामे, पुंडलिक लोणारे त्या जागेवर अतिक्रमण करीत आहे. ३० मे रोजी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करुन माहिती दिली. परंतु ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
मासळ तुकूम गावातील शासकीय जागेवरील अतिक्रमण होत असून तत्काळ चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी १० जुलैपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती माजी सरपंच सुनील शेडामे यांनी दिली. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनासुद्धा माहिती देण्यात आल्याचे माजी सरपंच सुनील शेडामे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)