जिल्ह्याच्या मागणीसाठी नागभीड कडकडीत बंद
By Admin | Updated: August 10, 2016 00:27 IST2016-08-10T00:27:58+5:302016-08-10T00:27:58+5:30
नागभीड हा नवा जिल्हा निर्माण करण्याच्या मागणीसाठी नागभीडकरांनी मंगळवारी कडकडीत बंद पाडला.

जिल्ह्याच्या मागणीसाठी नागभीड कडकडीत बंद
अनेक संघटनांचा सहभाग : तहसील कार्यालयावर हजारोंची धडक
नागभीड : नागभीड हा नवा जिल्हा निर्माण करण्याच्या मागणीसाठी नागभीडकरांनी मंगळवारी कडकडीत बंद पाडला. हजारोंच्या संख्येने नागरिक मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले. नागभीडच्या इतिहासात नागभीडकरांनी प्रथमच बंदला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
इतर तालुक्याच्या तुलनेत नागभीड कुठेही मागे नाही किंबहुणा जिल्ह्यासाठी जे निकष आहेत, ते सर्व निकष नागभीड शहरात आहेत, हे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी नागभीड जिल्हा कृती संघर्ष समितीच्या वतीने नागभीड बंद आणि मोर्चाचे आयोजन केले होते. कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागभीड येथील व्यापारपेठ, शैक्षणिक संस्था, पतसंस्था, बार असोशिएशन व अन्य संस्थांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. यानंतर येथील नगरपरिषदेच्या ओट्यावर जाहीर सभा घेण्यात आली.
भाजपा नेते संजय गजपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस ज्येष्ठ काँग्रेस नेते पंजाबराव गावंडे, कृती समितीचे अध्यक्ष भाऊराव डांगे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संतोष रडके, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद बावणे, राष्ट्रवादीचे माणिक जांभुळे, बार असोशिएशनचे अॅड. रविंद्र चौधरी, नागभीडचे माजी सरपंच जहांगीर कुरेशी, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष हनिफभाई जादा, रासपचे तालुका अध्यक्ष गजेंद्र खापरे, महेश पटेल, विजू काबरा, ओबीसी संघटनेचे अध्यक्ष दिगंबर चौधरी, प्रादेशिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर श्रीरामे, केमिस्ट व ड्रगिस्टचे अशोक वारजुकर, माजी उपसभापती दिनेश गावंडे, प्रमोद चौधरी यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख मान्यवरांची भाषणे झालीत. जिल्ह्यासाठी नागभीड कसे योग्य आहे, हे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यानंतर या सभेचे रुपांतर मोर्चात झाले. या मोर्चालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्याच्या समर्थनार्थ विविध घोषणा देत हा मोर्चा नागभीडच्या प्रमुख मार्गाने फिरत तहसील कार्यालयाच्या दिशेन निघाला. नागरिक जिल्ह्याच्या मागणीच्या देत असलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर निनादून निघाला होता. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात हा मोर्चा येताच पोलिसांनी मोर्चा अडविला. मोर्चेकऱ्यांनी यावेळी घोषणा दिल्या.
नागभीडचे तहसीलदार समीर माने यांनी स्वत: मोर्चाकऱ्यांना समोरे येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. (तालुका प्रतिनिधी)
न्यायालयाचे कामकाज ठप्प
नागभीड तालुका बार असोसिएशने एका लेखी निवेदनाद्वारे न्यायालयाला कळवून मंगळवारी न्यायालयातील कामकाजात भाग घेतला नाही. त्यामुळे न्यायालयाचे काम ठप्प होते, अशी माहिती बार असोसिएशनचे अॅड. रविंद्र चौधरी यांनी दिली.
तगडा पोलीस बंदोबस्त
खबरदारीचा उपाय म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दंगा नियंत्रण पथकासही पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी तैणात दिसून आले.
नागरिक पाठविणार मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड
जिल्ह्याच्या मागणीस भक्कम पाठींबा मिळावा यासाठी नागभीड जिल्हा कृती संघर्ष समितीकडून गावागावात जनजागरण करण्यात येणार असून प्रत्येक नागरिकांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना दोन पोष्ट कार्ड पाठविण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतींना जिल्ह्याच्या समर्थनार्थ ग्रामसभेत आणि मासिक सभेत ठराव घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.