ड्रग्ज माफियावर कारवाई करण्याची मागणी
By Admin | Updated: July 17, 2017 00:48 IST2017-07-17T00:48:26+5:302017-07-17T00:48:26+5:30
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असून तीन वर्षापूर्वी या जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत होता.

ड्रग्ज माफियावर कारवाई करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असून तीन वर्षापूर्वी या जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत होता. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झालीच पाहिजे, याकरिता महिलांनी सतत पाच वर्षे आंदोलन केली. अखेर या जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी झाली. दारूबंदी झाली असली तरी अवैध मार्गाने दारूविक्री सुरू आहे. अवैध दारू पकडण्यात पोलीस व्यस्त असताना याचा फायदा ड्रग्ज माफीयांनी घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.
चंद्रपुरातील महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी यांना ड्रग्जचे व्यसन लागले आहे. कॉलेज परिसरात ब्राऊन शुगर, अफीम, गांजा, गर्द यासारख्या मादक द्रव्यांची विक्री करण्यात येत असून विक्री करणारे तसेच नशा करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी २० वर्षाच्या खालील वयाचे आहेत. ड्रग्जची विक्री करताना कॉलेज परिसरात दोन विद्यार्थ्यांना ब्राऊन शुगरसह पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपुरातील वर्दळ नसलेले क्षेत्र ड्रग्ज सेवन करणाऱ्या युवकांसाठी स्वर्ग असून वरोरा नाक्याजवळ पुलाखाली, कॉलेज परिसरातील सुनसान क्षेत्र, लोहारा जंगल, जुनोना जंगल, रय्यतवारी कॉलरी, बगीचे, लालपेठ कॉलरी, जमनजट्टी अशा अनेक ठिकाणी युवक, युवती नशेत डोलताना आपणास दिसेल. विद्यार्थी अभ्यास सोडून नशेच्या आहारी गेल्यामुळे पालकवर्गात चिंता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना नशेपासून दूर ठेवण्याकरिता प्रत्येक कॉलेजमध्ये मिटींग घेऊन जनजागृती करणे आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर जिल्हा महासचिव हिरामण खोब्रागडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली. ड्रग्ज माफीयावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच जनजागृतीकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिले. शहर ठाणेदार भगत, रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक गोतमारे यांनाही भेटून ड्रग्ज माफीयावर कारवाई करण्याची मागणी केली.