जिल्ह्यात नऊ हजार लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोज देण्यात येणार आहे. त्याच नऊ हजार लाभार्थ्यांना दुसरा डोज २८ दिवसांनंतर देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली. जिल्ह्यात राज्य शासनाचे १२ हजार २७५, केंद्र शासनाचे ४१४ आणि ३ हजार ८३५ खासगी अशा एकूण १६ हजार ५२४ कोरोना योद्धा आरोग्य सेवकांची पहिल्या टप्प्यातील लस देण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. एका व्यक्तिला दोन डोस तसेच १० टक्के वेस्टेज याप्रमाणे जिल्ह्याला ३६ हजार ३५२ लसींची आवश्यकता होती. यापैकी मागणीच्या ५५ टक्के म्हणजे २० हजार लसी मिळाल्या आहेत. या लसी आज दुपारी संबंधित केंद्रांवर पाठविण्यात येणार आहेत.
असे होणार लसीकरण
जिल्ह्यात सहा केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यामध्ये चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर व पठाणपुरा आरोग्य केंद्र तसेच वरोरा, ब्रह्मपुरी व राजुरा येथील केंद्रांचा समावेश आहे. केंद्रात प्रतीक्षा, लसीकरण व निरीक्षण असे तीन कक्ष राहतील. को - विन ॲप नाेंदणी करून ओळख पटल्यानंतरच लस देण्यात येईल, लस दिल्यानंतर मोबाईलवर संदेश मिळेल. आपत्कालीन व्यवस्था म्हणून डॉक्टरांचे पथक व रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येईल.
कोट
मागणी केल्याप्रमाणे उर्वरित लस लवकरच प्राप्त होणार आहेत. त्यासाठी संबंधित अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. प्राप्त २० हजार लसींचे सूक्ष्म नियोजन पूर्ण झाले. त्यानुसारच आवश्यक सहा ठिकाणी लसीकरण केंद्रांना मंजुरी देण्यात आले. ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.
- अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर