मरणासन्न पक्षाला वाचवून दिला मानवतेचा परिचय
By Admin | Updated: March 12, 2015 00:39 IST2015-03-12T00:36:24+5:302015-03-12T00:39:12+5:30
मासोळी खाण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या अॅश पॉन्डवर गेलेल्या ‘ब्लॅक हेडेड आयबीस’ या पक्ष्याने चक्क गळच गिळला.

मरणासन्न पक्षाला वाचवून दिला मानवतेचा परिचय
चंद्रपूर : मासोळी खाण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या अॅश पॉन्डवर गेलेल्या ‘ब्लॅक हेडेड आयबीस’ या पक्ष्याने चक्क गळच गिळला. या ठिकाणी आज बुधवारी पक्षी निरीक्षणाकरिता गेलेल्या पक्षीमित्रांना हा पक्षी मरणासन्न अवस्थेत पडून असलेला दिसला. तातडीने त्याला पशु वैद्यकीय दवाखान्यात नेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. तत्पूर्वी एका खासगी दवाखान्यात नेऊन त्याचा एक्स रेही काढण्यात आला. एखाद्या पक्ष्यावर प्रथमच चंद्रपुरात शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती यशस्वीदेखील झाली. पक्षीमित्रांनी दिलेला हा मानवतेचा परिचय अनेक पक्षीमित्रांसाठी बळ व प्रेरणा देणारा ठरला आहे.
इको-प्रोचे वन्यजीवन विभाग प्रमुख विश्वजित इंगलवार, शशांक मुजमकर व राहुल कुचनकर हे आज बुधवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या अॅश पॉन्डवर गेले. या अॅश पॉन्डमध्ये एक ‘ब्लॅक हेडेड आयबीस’ नामक पक्षी दिसला. मात्र या पक्ष्याच्या तोंडात धागा अडकलेला दिसून आला. या पक्षीमित्रांनी पॉन्डमध्ये उतरून पक्षाला बघितले असता त्याच्या पोटात धागा गेल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे व नितीन बुरडकर यांना दिली. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती देत इंगलवार व मुजमकर यांना पक्ष्यावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या तीनही पक्षीमित्रांनी तात्काळ पक्ष्याला पशु वैद्यकीय दवाखान्यात नेले. मात्र पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना पक्ष्याच्या घशात काहीतरी अडकले असावे, असा संशय आल्याने त्यांनी एक्स रे काढण्याचा सल्ला दिला. पक्षीमित्रांनी डॉ. अजय वासाडे यांच्याकडे पक्ष्याला नेऊन एक्स रे काढला. डॉ. वासाडे यांनीही निशुल्क एक्स रे काढून दिला. एक्स रेमध्ये पक्ष्याच्या गळ्यात गळ अडकलेला दिसून आला. शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नसल्याने पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रामटेके, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.डी. धांडे व डॉ. पी.एस. दामले यांनी पक्ष्यावर शस्त्रक्रिया केली. अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सध्या हा पक्षी इको-प्रो या संस्थेच्या ताब्यात असून त्याची काळजी घेतली जात आहे. (शहर प्रतिनिधी)