देवतळेंच्या उमेदवारीवरून भाजपात कल्लोळ
By Admin | Updated: September 27, 2014 23:11 IST2014-09-27T23:11:32+5:302014-09-27T23:11:32+5:30
काँग्रेसचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री संजय देवतळे यांनी स्विकारलेली भाजपाची उमेदवारी ही शनिवारची सर्वात मोठी बातमी ठरली. मात्र या बातमीने अनेकांची झोप उडविली, तर वरोरा विधानसभा

देवतळेंच्या उमेदवारीवरून भाजपात कल्लोळ
भद्रावती-वरोऱ्यात अस्वस्थता : क्षोभ शमविण्याचे नेत्यांपुढे आव्हान
चंद्रपूर : काँग्रेसचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री संजय देवतळे यांनी स्विकारलेली भाजपाची उमेदवारी ही शनिवारची सर्वात मोठी बातमी ठरली. मात्र या बातमीने अनेकांची झोप उडविली, तर वरोरा विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये रण माजविले.
संजय देवतळे यांच्या उमेदवारीवरून वरोरा विधानसभा मतदार संघात भाजपामध्ये प्रचंड असंतोष उफाळला आहे. यामुळे पक्षात उभी फुट पडण्याची स्थिती असल्याने जिल्ह्यातील नेत्यांपुढे कार्यकर्त्यांचा क्षोभ शमविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
वरोरा आणि भद्रावती या दोन्ही तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते संजय देवतळे यांच्या उमेदवारीमुळे अस्वस्थ झाले आहेत. नामांकन भरण्यासाठी संजय देवतळे उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेले, मात्र त्यांच्यासोबत भाजपातील कुणीही कार्यकर्ता नव्हता. काँग्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य जैनुद्दीन जव्हेरी, भद्रावतीचे काँंग्रेस कार्यकर्ते अफजलभाई, वरोराचे एहतेश्याम अली आणि बाळू भोयर यांच्यासह जावून त्यांनी नामांकन सादर केले.
भाजपाकडून ओम मांडवकर यांचे नाव सकाळी पक्के झाल्याने हजारांवर कार्यकर्ते रॅलीच्या तयारीत होते. मात्र अचानकपणे संजय देवतळे यांचे नाव पुढे आले. एबी फॉर्मही परस्पर तिकडे पोहचला. यामुळे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते. वरोरा भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड यांनी देवतळेंच्या उमेदवारीचा विरोध करीत २८ ला बैठक बोलाविली आहे. भद्रावतीमध्येही अशीच बैठक होत आहे. या बैठकीनंतर कार्यकर्ते भूमिका ठरविणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)