‘त्या’ घटनेने दीपकचे आयुष्यच काळवंडले!
By Admin | Updated: February 12, 2015 00:52 IST2015-02-12T00:52:58+5:302015-02-12T00:52:58+5:30
१० वर्षांपूर्वी (मार्च २००४ मध्ये) किशोरावस्थेतील दीपक चंद्रपूर येथे रस्ता दुरुस्तीचे काम करीत होता. रोलरची माती काढताना त्याचा पाय रोलरच्या खाली आला.

‘त्या’ घटनेने दीपकचे आयुष्यच काळवंडले!
लोकमत मदतीचा हात
नंदोरी : १० वर्षांपूर्वी (मार्च २००४ मध्ये) किशोरावस्थेतील दीपक चंद्रपूर येथे रस्ता दुरुस्तीचे काम करीत होता. रोलरची माती काढताना त्याचा पाय रोलरच्या खाली आला. आणि दीपकचा डावा पाय गुडघापासून अक्षरश: तुटून पडला. अचानक आलेल्या या अपंगत्वाने त्याचे अख्खे आयुष्यच काळवंडले. पुढे भविष्य तरी चांगले व्हावे यासाठी तो संघर्ष करीत आहे. त्याला कुबडीचा नाही तर शासनाचा भक्कम आधार हवा आहे.
दीपक नगराळे याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई मंदाबाई मजुरी करायची. मातंग समाजाचे हे कुटुंब. वडील रामाजी नगराळे उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने उर फुटेपर्यंत, अगदी थकून जाईपर्यंत डफ बडवायचे आणि दिवसाकाठी कसेतरी २० ते २५ रुपये मिळवायचे. दीपकच्या अपघाताने वडील रामाजी नगराळे पूर्णत: खचले. मानसिक आघाताने आणि आजाराने खचलेल्या आई मंदाबाईला काम करण्याचे शरिरात त्राण उरले नव्हते. वर्षामागून वर्षे गेली. आज दीपक १८ वर्षाचा झाला. नियतीच्या खेळाने व गरिबीच्या परिस्थितीने दीपकला इयत्ता नववीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. असलेली पुंजीही दीपकच्या उपचारात खर्ची झाली. पायाने अपंग असलेल्या दीपकला कोणी काम देईना. आजही दीपक कागदपत्रांची पिशवी घेऊन आणि आपल्या कुबडीचा आधार घेऊन शासनदरबारी उंबरठे झिजवतोय. त्याला मदतीचा हात हवा आहे.
दीपकला कृत्रिम पाय बसवायचा आहे. त्याला पायाला सर्जरी करायची आहे. जवळ भांडवल नाही, सरकारी मदत मिळत नाही. त्याला उदरनिर्वाहाकरिता एखादी लहानशी नोकरी किंवा रोजगाराचे साधन मिळावे, अशी इच्छा त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. दीपकला पाच वर्षांपूर्वी एका शिबिरात कृृत्रिम पाय बसविण्यात आला होता. त्याचे आठ दिवसातच खिळे तुटून तो पुर्णपणे विस्कळीत झाला. यातही दीपकची फसवणूकच झाली.दीपक रोजगार सेवक म्हणून नियुक्त आहे. परंतु हाताला काम नाही. (वार्ताहर)