मामा तलावातील जलसाठ्यात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:43+5:302021-02-05T07:39:43+5:30
सिंदेवाही : तालुक्यात माजी मालगुजारी (मामा) तलाव बरेच आहेत; परंतु मायनरवरील आऊटलेट (मोरी बांधकाम) ची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे ...

मामा तलावातील जलसाठ्यात घट
सिंदेवाही : तालुक्यात माजी मालगुजारी (मामा) तलाव बरेच आहेत; परंतु मायनरवरील आऊटलेट (मोरी बांधकाम) ची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसातील पाणी अडू शकले नाही. या तलावाची दुरुस्ती केल्यास हे तलाव शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरू शकतात. याकडे लक्ष देऊन मामा तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
प्रवासी निवाऱ्याची मागणी
कोरपना : कोरपना- आदिलाबाद महामार्गवरील अनेक प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहून बस पकडावी लागते. प्रवासी निवारा बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रखर दिव्यांमुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : दुचाकी वा चारचाकी वाहनांच्या पुढे दिवे (हेड लाइट) लावले जाते. मात्र, काही तरुण साधे दिवे न लावता निळ्या रंगाचे तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या तरुणांवर कारवाई करून अपघाताला टाळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.
वजनाच्या नावाखाली दगडांचा वापर
जिवती : ग्राहकांना वस्तू मोजून देणे व वजनानुसार बरोबर पैसे घेणे, ही व्यवहाराची पद्धत आहे; पण पैसे बरोबर देऊनही वजनात तूट निर्माण होण्याच्या प्रकारामुळे ग्राहक लुटले जात आहेत. लहान- मोठ्या विक्रेत्यांकडून सर्रासपणे अशी लूट सुरू असून वजन म्हणून तेवढ्या वजनाचे दगड दिसून येतात. यात अनेकदा ग्राहकांची फसगत होत आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
टेमुर्डा : चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील टेमुर्डा परिसरात मोकाट जणावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. जनावरांमुळे अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत. जणावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
जात प्रमाणपत्र प्रकरणे प्रलंबित
जिवती : तालुक्यातील काही नागरिक मागील ४० ते ५० वर्षांपासून या ठिकाणी राहतात. मात्र, अद्यापही अनेकांकडे जात प्रमाणपत्र नाही. प्रमाणपत्र मिळावे, यासाठी कागदपत्रांसह अर्ज सादर केले. मात्र, प्रकरणांचा निपटारा झाला नाही.
महामार्ग बनले मृत्यूमार्ग
कोरपना : तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यातील एकही रस्ता आजघडीला खड्ड्यावाचून नाही. या मार्गावरून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावले
भद्रावती : माजरी मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जात आहे. अनेक वाहने उघड्यावर कोळशाची वाहतूक करीत असल्याने या रस्त्यावर कोळशाच्या धुळीचा थर साचतो. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असून अनेकांना श्वसनाचा आजारही जडला आहे.
हिरापूर मार्गावरील खड्डे धोकादायक
नांदाफाटा : नांदाफाटा ते वणीकडे जाणाऱ्या आवारपूर-हिरापूर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
प्लास्टिक पिशव्यांना आळा घाला
राजुरा : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात़. या पिशव्या कुठेही टाकून देण्याचे प्रकार वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरवासींनी केली आहे़.
एटीएम कक्षात सुरक्षारक्षक नियुक्त करावे
वरोरा : शहरातील विविध भागांमध्ये बँकांनी एटीएम सेवा सुरू केली आहे. ग्राहक याचा लाभसुद्धा घेत आहेत. मात्र, काही ठिकाणी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून येत आहे. भविष्यात काही धोका झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे.
विहिरींचे अनुदान तातडीने द्यावे
भद्रावती : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले आहे. शासनाने विहिरीसाठी अनुदान जाहीर केले होते. शेतकऱ्यांनी विहीर बांधल्याची कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करूनही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे अनुदान देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.