भूजल पातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:27 IST2017-12-04T00:27:32+5:302017-12-04T00:27:47+5:30
मूल तालुक्यात आधी पाण्याची कमतरता नव्हती. मात्र दिवसेंदिवस पाण्याची भिषण समस्या जाणवत आहे. आधी ४०-५० फुटांवर पाणी लागत होते.

भूजल पातळीत घट
आॅनलाईन लोकमत
मूल : मूल तालुक्यात आधी पाण्याची कमतरता नव्हती. मात्र दिवसेंदिवस पाण्याची भिषण समस्या जाणवत आहे. आधी ४०-५० फुटांवर पाणी लागत होते. मात्र आता विविध स्रोताद्वारे भूगर्भातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत असल्याने भूजल पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. त्यामुळे आधी ४० फूटावर लागणारे पाणी आता १५० ते २०० फुटांवर लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
मूल तालुक्यातील सभोवतालचा भागात शेतकरी राहात असून या भागातील शेतकरी खरीप व काही शेतकरी रबी अशा दोन्ही हंगामात शेती करतात. भूगर्भात भरपूर पाण्याचे स्त्रोत असल्यामुळे या भागातील काही शेतकरी पाण्याचा उपसा करुन पीक घेतात. तसेच पाण्याचा वापर करणारे व्यावसायिकसुद्धा मुबलक पाण्याचा उपसा करीत असल्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात आहे. प्रत्येक नागरिक भूगर्भातील पाणी मिळविण्यासाठी वाट्टेल ते प्रयोग करीत असल्याचेही चित्र काही भागात दिसून येते. पूर्वी खोदकाम केले असता विहिरीला भरपूर पाणी लागत होते. मात्र आता हाताने खोदकाम करणाऱ्या विहिरीला पाणीच लागत नाही.
पाण्याचा वाट्टेल तसा उपसा होत असतानाही यावर अंकुश नाही. कोणतीही उपाययोजना शासनाकडून केली जात नाही. ‘पाणी अडवा पाणी जीरवा’ ही योजना केवळ कागदावरच राबविली जात असल्याचे दिसून येत आहे. पावसाचे पाणी अडवून भूगर्भात जीरवून पाण्याची पातळी वाढविली जाऊ शकते. मात्र यासाठी शासनासोबतच प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.