चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
By Admin | Updated: December 3, 2014 22:48 IST2014-12-03T22:48:23+5:302014-12-03T22:48:23+5:30
कापसाला किमान सात हजार रुपये तर धानाला ३५०० रुपये भाव द्यावा व चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व कापसाला बोनस द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
चंद्रपूर : कापसाला किमान सात हजार रुपये तर धानाला ३५०० रुपये भाव द्यावा व चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व कापसाला बोनस द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यावर्षी जिल्ह्यात तब्बल दीड महिना उशीरा पाऊस आल्यामुळे सोयाबीन व धानाच्या पऱ्हयांची उशीरा लागवड झाली तर कपाशीची लागवडसुद्धा उशीराच झाली. त्यात सोयाबीनचे पीक तर गेलेच. सोबतच पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे धानाच्या व कापसाच्या उत्पन्नामध्ये बरीच घट झाली असून शेतकऱ्यांना उत्पन्न फारच कमी प्रमाणात होत आहे. त्यातच शेतमालाला भााव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. भाजपा सरकारकडून सत्तेत आल्यास शेतकऱ्याच्या शेतीत उत्पन्नाच्या खर्चावर आधारित आणखी पन्नास टक्के वाढवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र भाव वाढवून देणे दुरच पण असलेल्या भावाच्या ३० ते ४० टक्के कमी भाव देण्यात येत आहे.
कापसाला हमी भाव फक्त ४०५० रुपये देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसली जात आहे. शासनाने दिलेल्या हमी भावाचा निषेध करत कापसाला प्रति क्विंटल १५०० ते २००० हजार रुपये बोनस देण्यात यावा व ती रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेने केली आहे. उशिरा आलेल्या पावसामुळे धान व सोयाबीनच्या उत्पादनावर फार मोठा फरक पडला असून शेतकऱ्याला आपली परिस्थिती सुधारता यावी,यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे.
वीजशिवाय पाणी नाही तर पाण्याशिवाय शेती नाही. आधीच पावसाने उशीरा हजेरी लावल्यामुळे शेतकरी अर्धाअधिक खचला असून त्याला धीर देण्याकरिता शासनाने प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. शेतकऱ्याकडे असलेल्या कृषी पंपाच्या वीज वापराची थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणाच्या वतीने कृषी संजीवनी योजना सुरू केली. मात्र ही योजना आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर पर्यंतच होती. आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये शेतकऱ्याकडे पैसाच उपलब्ध नसतो. आता शेतकऱ्याच्या घरात उत्पन्न येण्याची वेळ असून कृषी संजीवनी योजना पुर्ववत सुरू ठेवावी. याशिवाय जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष (ग्राहक) डॉ. देव कन्नाके, जिल्हाध्यक्ष (विद्यार्थी) नितीन भटारकर, गजानन पाल, संजय पिंपळकर, प्रदीप रत्नपारखी, पूजा उईके यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)