शेतीला उद्योग घोषित केल्यास प्रदूषणमुक्ती
By Admin | Updated: February 28, 2017 00:38 IST2017-02-28T00:38:10+5:302017-02-28T00:38:10+5:30
शेती हा चिरंतन उद्योग आहे. उद्योग व खनिज यांचा साठा मर्यादित आहे.

शेतीला उद्योग घोषित केल्यास प्रदूषणमुक्ती
सुरेश चोपणे : ‘आमचे गाव-आमचा वक्ता’ उपक्रम
चंद्रपूर : शेती हा चिरंतन उद्योग आहे. उद्योग व खनिज यांचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे शेतीला उद्योग घोषित केल्यास उद्योगांची वाढती संख्या नियंत्रित करता येईल. त्यातून प्रदूषणमुक्त वातावरणात निर्माण करणे शक्य होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आणि ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले.
विदर्भ साहित्य संघ, गोंडवन शाखेतर्फे 'आमचं गाव आमचा वक्ता' या उपक्रमात प्रा. चोपणे बोलत होते. विसा संघाने सऔद्योगिक विकास आणि पर्यावरण’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आकाशवाणी जवळच्या इन्स्पायर संस्थेच्या सभागृहात आयोजित केले होते.
यावेळी प्रा. चोपणे पुढे म्हणाले की, उद्योगाचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विकेंद्रित करणे आवश्यक आहे. छोटे-छोटे उद्योग उभारले पाहिजे. लघु उद्योगांमुळे रोजगार निर्मिती होत असते. मात्र संसाधने व आपली सोय पाहून उद्योगवाले केवळ नफा कमावण्याचे धोरण राबवतात. भारतात पर्यावरण रक्षणासाठी सर्वात जास्त व सर्वात चांगले कायदे आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नाही. उलट आपल्या देशात पर्यावरण संरक्षणाचे कायदे सर्वात जास्त मोडले जातात, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
चंद्रपुरातील ५४ टक्के लोकांना विविध आजार
औदयोगिक विकास झाला म्हणजे मानवाचा विकास झाला, असे नाही. चंद्रपुरातील ५४ टक्के लोक विविध आजारांनी ग्रस्त आहेत. भारताचा विकास १७ टक्के शेतीवर, २४ टक्के उद्योगावर आणि ५७ टक्के सेवाक्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे आता आपला देश शेतीप्रधान राहिलेला नाही. मात्र शेती ५८ टक्के रोजगार देते. तर उद्योग केवळ २० रोजगार देतात. म्हणजे उद्योग येऊनही आपल्याला रोजगार देऊ शकले नाहीत, असेही प्रा. चोपणे यांनी स्पष्ट केले.