बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणाची समिती घोषित करा
By Admin | Updated: April 2, 2016 00:50 IST2016-04-02T00:50:11+5:302016-04-02T00:50:11+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी येणारी शतोकोत्तर रौप्य जयंती लक्षात घेता सौंदर्यीकरणाच्या कामाला गती देण्याकरिता ..

बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणाची समिती घोषित करा
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी येणारी शतोकोत्तर रौप्य जयंती लक्षात घेता सौंदर्यीकरणाच्या कामाला गती देण्याकरिता आयुक्त यांच्या नेतृत्वामध्ये एक सर्व समावेशक समिती गठीत करण्यात यावी, रिपब्लिकन सेनेने केली आहे.
चंद्रपूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा १९६९ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अथक प्रयत्नातून स्थापन करण्यात आला. सध्यस्थितीमध्ये पुतळ्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. तसेच पुतळ्याला संलग्न असलेली जागा ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क असे संबोधण्यात येते. त्यावर देखील अतिक्रमण झाले आहे. रिपब्लिकन सेनेच्यावतीने २०१४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा व संलग्न असलेल्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तसेच वेळोवेळी या बाबीकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यात आले होते. त्याचप्रमाणे महानगरपालिकेने या सौंदर्यीकरणाच्या कामाकरिता ४० लाख रुपयांचा निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे.
या समितीमध्ये आंबेडकरी अनुयायी यांनासुद्धा समाविष्ट करून घेण्यात यावे आणि तसेच १४ एप्रिल पूर्वी नेहमीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे कार्यक्रम आयोजित करण्याकरिता अडसर ठरत असलेला आतील भागातील ट्रान्सफार्मर हा १४ एप्रिलला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी हटवावा, आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख तथागत पेटकर आपल्या कार्यकर्त्यांसह आयुक्त यांना भेटले. त्यावर आयुक्तांनी डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी समिती स्थापना करण्याचे मान्य केले. समितीत समाविष्ट करण्यात येणाऱ्याची यादी तयार करून सादर करण्याची सूचना केली. याप्रसंगी शहर प्रमुख संदीप सोनोने, गणेश नवाडे, संदीप खोब्रागडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)