वैद्यकीय महाविद्यालय रोखण्याचा निर्णय राज्यासाठी विश्वासघातकीच
By Admin | Updated: June 21, 2015 01:42 IST2015-06-21T01:36:52+5:302015-06-21T01:42:45+5:30
राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रोखणे हा भाजपा नेत्यांचा आणि सरकारचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी विश्वासघाताचा आहे.

वैद्यकीय महाविद्यालय रोखण्याचा निर्णय राज्यासाठी विश्वासघातकीच
चंद्रपुरात एनएसयूआयचे धरणे : नेत्यांचे भाजपावर टीकास्त्र
चंद्रपूर : राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रोखणे हा भाजपा नेत्यांचा आणि सरकारचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी विश्वासघाताचा आहे. याचे घातक परिणाम भविष्यात दिसूनच येणार आहेत, अशी खरमरीत टीका एनएसयूआयने केली.
चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातून विरोधाचा सूर उमटत आहे. शनिवारी याच मुद्यावरून जिल्हा एनएसयूआयने चंद्रपुरातील गांधी चौकात दिवसभर धरणे दिले. त्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव राहूल पुगलिया यांच्या नेतृत्त्वात सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवदेन सादर केले.
चंद्रपूर जिल्हा एनएसयूआय प्रमुख दुर्गेश चौबे, उपाध्यक्ष रोशनलाल बिट्टू, सरोज यादव, गोंडवाना विद्यापिठ विद्यार्थी प्रतिनिधी संघाचे माजी अध्यक्ष राहूल मानकर यांच्या पुढाकाराने सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा धारणा सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता. त्यात एनएसयूआयसह जिल्हा काँग्रेस कमेटी, महानगर काँग्रेस कमेटी, महिला काँग्रेस कमेटी, सेवादलाचे पदाधिकारी, बल्लारपूर पेपर मील काँग्रेस मजदूर युनियनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
काँगे्रसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनीही दिवसभर धरण्यात सहभाग घेतला. त्यांच्यासह प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव राहूल पुगलिया, गावंडे गुरूजी, नंदू नागरकर, प्रविण पडवेकर, संजय महाडोळे, वसंत मांढरे, अशोक नागापुरे, महिला काँग्रेस कमेटीच्या पदाधिकारी नगरसेविका उषा धांडे, सुनिता लोढीया, विणा खनके यांच्यासह अनेक नेतमंडळी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
धरणादरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भाजपावर आणि स्थानिक आमदारांवर जोरदार टीका करण्यात आली. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रयत्न केले होते.
सर्व तयारी झाल्यावर ऐनवेळी राज्यातील सहाही वैद्यकीय महाविद्यालयांची परवानगी नाकारण्यात आली. चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयाचा संबंध येथील प्रदुषण, जलप्रदुषण, कामगार वर्गाशी संबंधित असल्याने हा जनतेशी विश्वासघात आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)