चंद्रपूर दारूबंदीच्या निर्णयाने जिल्हा सीमा घेणार मोकळा श्वास
By Admin | Updated: February 5, 2015 23:07 IST2015-02-05T23:07:39+5:302015-02-05T23:07:39+5:30
२६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या भागात मोठ्या प्रमाणावर दारू दुकान आहेत.

चंद्रपूर दारूबंदीच्या निर्णयाने जिल्हा सीमा घेणार मोकळा श्वास
गडचिरोली : २६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या भागात मोठ्या प्रमाणावर दारू दुकान आहेत. १ एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगतचे १५ दारू दुकान, बिअर शॉपी व भट्ट्या बंद होणार आहे. त्यामुळे दारूबंदी असलेल्या जिल्ह्याची सीमा चंद्रपूर जिल्ह्याच्या भागात आता मोकळा श्वास घेणार आहे.
२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यानंतर ११ वर्षांनी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. परवानाप्राप्त दारू दुकान जिल्ह्यातून हद्दपार झालेत. मात्र लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नसल्याने या भागात गडचिरोलीच्या सीमेला लागूनच १५ दारू दुकानांचा डेरा दाखल झाला. यामध्ये सावली तालुक्याच्या व्याहाड भागात पाच दुकान तर चामोर्शी तालुक्याच्या सीमेवरील आष्टी लागून चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यात चार दारू दुकाने व हातभट्ट्यांचा व्यवसाय तर आरमोरी तालुक्याला लागून ब्रह्मपुरी तालुक्यात पाच बिअर शॉपी परवाना घेऊन सुरूच होते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदीला कुठेही अर्थ उरला नव्हता. जिल्ह्यातील दारू शौकीत या भागात जाऊन आपली दारूची भूक भागवून घेत होते. आता १ एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाने घेतला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या तीन सीमा दारूमुक्त होणार आहे. सावली, गोंडपिंपरी व ब्रह्मपुरी तालुक्यात सीमा भागात असलेले दारू दुकान, बिअर शॉपी व हातभट्ट्या बंद केल्या जातील. मात्र देसाईगंज तालुक्याला लागून असलेल्या लाखांदूर भागात तसेच कोरची तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड, तेलंगणा राज्याच्या सीमांमध्ये मात्र दारूचे अवैध दुकान कायम राहणार आहेत. या राज्यात फिरते दारू दुकानेही आहेत. त्यामुळे ते दुकान जिल्ह्यात घुसखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दारूबंदीवरचे ग्रहण कायमच राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)